आपण ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीकडून आपल्याला चांगल्या सुविधा मिळाव्यात, असे प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटत असते. मग अनेकदा मित्रांमध्ये किंवा सोशल मीडियावरही आपली कंपनी काय देते आणि काय देत नाही यावरुन चर्चा रंगते. विशेष म्हणजे अनेकदा नोकरी स्वीकारतानाही कंपनी किती सुट्या देते. पगार सोडून आपल्याला कोणत्या सुविधा कंपनी देणार आहे हे कर्मचाऱ्यांकडून आवर्जून पाहिले जाते. यामध्ये जीम, रेस्ट रुम यांसारख्या सुविधांचा समावेश असतो. मात्र काही कंपन्या यापलीकडे जाऊन आपल्या कर्मचाऱ्यांना सुविधा देतात आणि त्यामुळे त्या विशेष चर्चेतही असतात. यामध्ये गुगल आणि मायक्रोसॉफ्ट कायमच आघाडीवर आहेत. आता फ्लिपकार्टनेही यामध्ये स्थान मिळवले आहे. पण या कंपन्या अशा कोणत्या सुविधा देतात ज्यामुळे मार्केटमध्ये त्यांची इतकी चर्चा असते पाहूयात ….

गुगल

गुगल कर्मचाऱ्यांना विविध सुविधा देत असल्याने कायमच चर्चेत असते. यामध्ये अनेक आकर्षक सुविधांचा समावेश आहे. गुगलमध्ये कर्मचाऱ्यांना हेअरकट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. अशाप्रकारची सुविधा देणारी गुगल ही निश्चितच अनोखी कंपनी आहे असे म्हणता येईल. याशिवाय कर्मचारी दमले तर त्यांना विश्रांती मिळावी यासाठी पॉवरनॅपची मशीनही कंपनीत उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. याहून आकर्षक गोष्ट म्हणजे कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना लाँड्रीची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे.

मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्ट कंपनी आपल्या सगळ्यांच्याच माहितीची आहे. या कंपनीचे काम जगातील अनेक देशांमधून चालते. कंपनीच्या कामाचा कर्मचाऱ्यांवर ताण येऊ नये तसेच येथील हसत खेळत वातावरणात काम व्हावे यासाठी कंपनीने ट्रीहाऊस केले आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना अनौपचारिक पद्धतीने काम करता येते.

अॅपल

अॅपलकडून आपल्या कर्मचाऱ्यांना अॅपलच्या उत्पादनांवर भरघोस सूट दिली जाते. अॅपलच्या कर्मचाऱ्यांना आयपॉड, आयपॅड आणि कॉम्प्युटरवर २५ टक्के सूट देण्यात येते. याशिवाय हे कर्मचारी अॅपलचे काही सॉफ्टवेअर्सही ५० टक्के सवलतीत खरेदी करु शकतात. विशेष बाब म्हणजे पार्ट टाईम कर्मचाऱ्यांनाही कंपनीकडून अनेक सुविधा देण्यात येतात.

फ्लिपकार्ट

आपल्या कर्मचाऱ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहावे यासाठी कंपन्या मदत करताना दिसतात. फ्लिपकार्टतर्फे कर्मचाऱ्यांना २४ तासांसाठी टेलिफोनिक कौन्सिलिंगची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये कामाशिवाय कौटुंबिक अडचणी, इतर कायदेशीर बाबी आणि इतर कोणत्याही तक्रारींबाबत समुपदेशन करण्यात येते.