डिजिटल गेमिंगचं विश्व स्मार्टफोनवरील गेमिंगने बदलून टाकले. डिजिटल गेमिंगला सुरुवात होऊन आता जवळपास सात दशके लोटत आली आहेत. या दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानातील प्रगतीनुसार डिजिटल गेमिंगमध्येही आमूलाग्र बदल होत गेले. अ‍ॅनालॉग व्हिडीओ गेमपासून गेमिंग पॉडपर्यंत आणि पीसी गेमपासून कन्सोल गेमपर्यंत विविध उपकरणांतून डिजिटल गेमिंगचा चाहता वर्ग वाढत गेला. मात्र, स्मार्टफोनने डिजिटल गेमिंगप्रेमींमध्ये कैक पटीने वाढ केली. या क्षेत्राचं भवितव्यच स्मार्टफोनशी संलग्न राहते की काय, अशी परिस्थिती आहे. मात्र, असे असताना नुकत्याच आलेल्या एका अहवालाने गेमिंगचा नवा कल अधोरेखित केला आहे.

भारतातील गेमिंग समुदायात पीसी गेमिंगचा वाढता प्राधान्यक्रम असल्याचे एचपी इंडिया या कंपनीने केलेल्या अभ्यास संशोधनात स्पष्ट झाले आहे. खरं तर कॉम्प्युटर गेमिंग नेहमीच लोकप्रिय राहिले आहे. मात्र, त्यासाठी येणारा खर्च आणि एकाच ठिकाणी बसून खेळण्याची मर्यादा यांमुळे स्मार्टफोन गेमिंगकडे वापरकत्र्य़ाचा ओढा वाढत राहिला आहे. परंतु, एचपी इंडिया गेमिंग लँडस्केप रीपोर्ट २०२१ मध्ये नमूद केल्यानुसार ८९ टक्के प्रतिसादकर्त्यांंच्या मते स्मार्टफोनच्या तुलनेत पीसीवर अधिक चांगला गेमिंग अनुभव मिळतो. विशेष म्हणजे, दर १० पैकी ४ मोबाइल गेमर्सनी (३७ टक्के) गेमिंगसाठी पीसीकडे वळणार असल्याचे मत नोंदवले. अधिक चांगल्या अनुभवासाठी हा बदल केला जाणार आहे.

या सर्वेक्षणात मार्च आणि एप्रिल २०२१ या काळात भारतातील २५ महानगरे, प्रथम आणि द्वितीय श्रेणी शहरांमधील १५०० प्रतिसादकर्त्यांंना सहभागी करून घेण्यात आले.  अ१, अ२ आणि इ१ विभागांतील १५ ते ४० या वयोगटांतील पुरुष (७२ टक्के) आणि महिलांच्या (२८ टक्के) मुलाखती यासाठी घेण्यात आल्या. सर्व प्रतिसादकर्ते पीसी आणि/किंवा मोबाइल फोन वापरकर्ते होत. ते पीसी आणि स्मार्टफोनवर अ‍ॅक्शन आणि अ‍ॅडव्हेंचर गेम्सचा वापर करतात.

भारतात मोबाइल फोन्सच्या तुलनेत पीसीचा वापर मर्यादित स्वरूपात आहे. त्यामुळे, पीसी गेमिंग क्षेत्रात वाढीच्या प्रचंड संधी असल्याचे स्पष्ट होते. गेमिंगसाठी पीसीकडे वळण्याला प्राधान्य दिले जाण्यामागे नवतरुण वर्ग आणि किशोरवयीन वयोगटातील गेमर्सचा वाढता कल कारणीभूत आहे. द्वितीय श्रेणी शहरातील ९४ टक्के, प्रथम श्रेणी शहरातील ८८ टक्के आणि महानगरांमधील ८७ टक्के प्रतिसादकर्ते अशा प्रचंड मोठय़ा संख्येने वापरकर्ते गेमिंगसाठी मोबाइलऐवजी पीसीला प्राधान्य देत आहेत. अधिक चांगला प्रोसेसिंग वेग, डिस्प्ले आणि ध्वनी ही गेमर्स पीसी गेमिंगकडे वळण्याची महत्त्वाची कारणे असल्याचे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या गेमर्सचे म्हणणे आहे.

करिअरचा पर्याय म्हणून गेमिंग

गेमिंग हा करिअरसाठी एक व्यवहार्य पर्यायही ठरत आहे. ९० टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी गेमिंग इंडस्ट्री हा व्यवहार्य करिअर पर्याय असल्याचे मान्य केले. कदाचित आश्चर्य वाटेल, मात्र ८४ टक्के महिला प्रतिसादकर्त्यांना आणि ८० टक्के पुरुष प्रतिसादकर्त्यांना गेमिंगमध्ये करिअर करायचे आहे. जेन एक्स (९१ टक्के) आणि शालेय विद्यार्थी (८८ टक्के) यांनाही असे वाटते. गेमिंग क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहणाऱ्यांचे प्रमाण द्वितीय श्रेणी शहरात (८४ टक्के) प्रथम श्रेणी शहरांच्या तुलनेत (७८ टक्के) काहीसे अधिक आहे. महिला, जेनझेड, पश्चिम भारतातील आणि द्वितीय श्रेणी शहरातील प्रतिसादकर्ते यांच्यात गेमिंगला करिअर म्हणून अधिक प्राधान्य आहे.

ताण कमी करणारे गेमिंग

एचपी इंडिया गेमिंग लँडस्केप रीपोर्ट २०२१ मधील निष्कर्षांनुसार ताण दूर करण्यासाठी तसेच मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, विशेषत: सध्या मर्यादित स्वरुपात एकमेकांना भेटण्याचे आव्हान असतानाच्या काळात पीसी गेमिंगचा वापर एकमेकांसोबत जोडले जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. ९२ टक्क्यांहून अधिक प्रतिसादकर्त्यांनी हे मान्य केले की गेमिंगमुळे कामाचा/अभ्यासाचा ताण कमी होतो आणि ताण कमी करून सकारात्मक भावना वाढीस लागतात. इतकेच नाही, ९१ टक्के प्रतिसादकर्त्यांना वाटते की सहकाऱ्यांच्या पातळीवर सोशलाइजिंगमध्ये गेमिंगचा फायदा होतो आणि त्यामुळे नवे मित्र जोडणे शक्य होते. त्याचप्रमाणे, ९१ टक्के प्रतिसादकर्त्यांच्या मते गेमिंगमुळे लक्ष देण्याची क्षमता आणि एकाग्रता वाढते.

ग्राहकांचा प्राधान्यक्रम

पीसी निवडताना, विशेषत: गेमिंगसाठी वापरकर्त्यांचा महत्त्वाचा प्राधान्यक्रम काय असतो, यावरही या सर्वेक्षणात विचार करण्यात आला आहे. सर्वेक्षणात सहभागी सर्व पीसी वापरकर्त्यांपैकी एक तृतीयांश (३३ टक्के) जणांनी खरेदीचा निर्णय घेताना गेमिंग वैशिष्टय़ांना प्राधान्य दिले. अधिक चांगला प्रोसेसिंग वेग (६५ टक्के) आणि ग्राफिक्स क्षमता (६४ टक्के) हा गेमिंग पीसी निवडतानाचा ग्राहकांचा महत्त्वाचा प्राधान्यक्रम होता.

पीसीचे महत्त्व

एचपी इंडिया मार्केटचे केतन पटेल म्हणाले, माणसं घरातच अधिक वेळ सध्या घालवत आहे. ग्राहकांना मनोरंजन, ताण दूर करणे आणि सोशल कनेक्टसाठी नवनवे पर्याय हवे असल्याने गेमिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या परिस्थितीत, गेमिंगचा सर्वाधिक सर्वसमावेशक अनुभव देणारे प्राधान्यक्रमाचे डिव्हाइस अशी पीसीची ओळख दृढ होत आहे. गेमिंगसोबतच या संशोधनात प्रतिसादकर्त्यांंनी ते पीसीवर मनोरंजन (५४ टक्के), फोटो/व्हिडीओ एडिटिंग (५४ टक्के) आणि ग्राफिक डिझाइन (४८ टक्के) अशी महत्त्वाची कामेही करतात असे मत नोंदवले. यातून गेमिंग क्षमतांसोबतच पीसीमधील बहुविधता अधोरेखित होते.