सकाळी हिरव्या भाज्यांची स्मुदीही फायद्याची; ‘फ्रिडम फ्रॉम डायबेटिस’ची आहार पद्धती

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : लठ्ठपणाावर नियंत्रणासाठी इंटरनेटवर व्हिडीओ पाहून चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जातो. अघोरी उपायातून शारीरिक व्याधी जडतात. मात्र फ्रिडम फ्रॉम डायबेटिसने नवीन आहार पद्धत विकसित केली आहे. त्यानुसार जेवणात पोळी, भाजी, सलाद, वरणाचे प्रत्येकी २५ टक्के असे समान सेवनासह सकाळी हिरव्या भाज्यांची स्मुदी घेतल्यास लठ्ठपणावर नियंत्रण मिळू शकते.

प्रत्येकाच्या शरीरयष्टी, वजन, उंची व क्षमतेवरून आहार तज्ज्ञ तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने लठ्ठपणा नियंत्रणासाठी संबंधिताच्या आहारात बदल आवश्यक आहे. पण मनात येईल तसे बदल केल्याने आजार उद्भ वतात. फ्रिडम फ्रॉम डायबेटिसनेही तज्ज्ञांच्या सल्ल्याने आहार पद्धत विकसित केली आहे. त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला जेवणात पोळी, भाजी, वरण, सलाद या चारही पदार्थाची शरीराला गरज असलेल्या प्रमाणात समसमान म्हणजे प्रत्येकी २५ टक्के सेवन करायचे आहे. यानुसार अर्धी किंवा एक पोळीसोबत प्रत्येकाला १ वाटी वरण, १ वाटी भाजी, १ वाटी सलाद खायचा आहे.

पुन्हा पोळी घेतल्यास त्या प्रमाणात वरण, भाजी, सलादचे प्रमाणही तेवढेच वाढवायचे आहे. त्यामुळे आपोआप प्रत्येकाचे जेवण कमी होऊन शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते. अशा जेवणात शरीराला आवश्यक सर्व घटक मिळतात. त्यामुळे शारीरिक व्याधी उद्भवत नाही. सोबतच रोज सकाळी जेवणात विशिष्ट हिरव्या भाज्यांसह मसाल्याची स्मुदीही सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे वजनावर लवकर नियंत्रण मिळण्यास मदत होते. आपण एखादा पदार्थ आवडला तर जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्यावर जास्तच ताव मारतो. त्यामुळे दुसऱ्या काही पदार्थाकडे दुर्लक्ष होते. पर्यायाने शरीरात साखर जास्त जाते.

हिरव्या स्मुदीमध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे आणि काही विशिष्ट मसाले आहेत. सध्याच्या आहारात आपण हरित द्रव्य पुरेशा प्रमाणात घेत नाहीत. हे द्रव्य बरेच आजार बरे करू शकतात. पालेभाज्या शिजवल्याने बरेच हरित द्रव्य नष्ट होते. यासाठी हिरव्या स्मुदीचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या पेयाने जुनाट आम्लपित्त आणि सांधेदुखी कमी झाली आहे. हृदयरोगामध्ये रक्तवाहिन्यात आम्लता व सूज वाढल्यानंतर चरबी जमा होऊन हृदयविकाराचा झटका येतो. ही आरोग्यदायी हिरवी संजीवनी (स्मुदी) या सर्वासाठी उपयुक्त आहे. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायामही लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवश्यक आहे.

– डॉ. प्रमोद त्रिपाठी, फ्रीडम फ्रॉम डायबेटिस.

‘स्मुदी’ बनवण्याची पद्धत

हिरवी पालेभाजी (कोणतीही एक) उदा : पालक (५ ते ६ पाने) किंवा आंबट चुका (१० ते १५ पाने) किंवा चाकवत किंवा राजगिरा/ अंबाडी हे सर्व व्यवस्थित धुवून मिक्सरमध्ये टाकावे. त्यात पुदिना (२० ते २५ पाने) व विडय़ाचे पान (१) सुरुवातीला याच दोन वस्तू टाकाव्या. एका आठवडय़ानंतर तुळस, कढीपत्ता, कोथिंबीर आलटून पालटून चवीनुसार टाकावे. एक फळ टाकावे. जर उपाशीपोटीची साखर ११० पेक्षा जास्त असेल तर सफरचंद किंवा पेरू याचा वापर करावा. जर उपाशीपोटीची साखर ११० पेक्षा कमी असेल तर किंवा मधुमेही नसाल तर केळ किंवा चिक्कू वापरावा. चिमूटभर दालचिनी व काळी मिरी, अर्धा चमचा सैंधव मीठ व अर्धा लिंबाचा रस घालावा. एक ग्लास पाणी. मिक्सरमध्ये तीन मिनिटे फिरवावे. न गाळता ही हिरवी स्मुदी एकेक घोट सावकाश प्यावी.