जगप्रसिद्ध ग्लास (काच) कंपनी असणाऱ्या कॉर्निंगने गोरीला ग्लास सहाची घोषणा केली आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनसाठी वापरण्यात येणाऱ्या सध्याच्या गोरीला ग्लास ५ पेक्षा हे नवीन व्हर्जन जास्त दणकट आणि टिकाऊ असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आधीच्या सर्व ग्लासेसपेक्षा ही ग्लास नक्कीच जास्त टिकेल असे कंपनीने सांगितले आहे.

या नवीन गोरीला ग्लासवर कंपनीने अनेक चाचण्या केल्यानंतरच ती बाजारात आणली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार १ मीटरच्या उंचीवरुन १५ वेळा पडल्यानंतरही या काचेला काहीच झाले नाही. म्हणजेच सध्याच्या गोरीला ग्लासपेक्षा ही नवीन ग्लास दुप्पटीने अधिक मजबूत आहे. याबद्दल बोलताना कॉर्निंग गोरीला ग्लासचे उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक जॉन बेन यांनी, ‘गोरीला ग्लास ६ ही अनेक चाचण्यांच्या मदतीने तपासून पाहण्यात आली आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे एकवेळ एकदा नाही तर अनेकदा पाडूनही या ग्लासला तडा जात नसल्याचे दिसून आले.’

सध्या अनेक स्मार्टफोनच्या स्क्रीन्सचा आकार वाढताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी फोनची जाडी आणि वजन कमी होत आहे. त्यामुळेच अनेकदा फोन हातातून सरकून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच आता स्क्रॅचप्रुफबरोबरच ड्रॉप रेझिटंट स्क्रीनचाही संकल्पना चांगलीच जोर धरु लागली आहे. म्हणूनच या नवीन गोरीला ग्लास ६मध्ये कंपनीने या दोन्ही गोष्टींचा विचार केला आहे. ही नवीन ग्लास ही जुन्या गोरीला ग्लास ५ पेक्षा अधिक दणकट आणि मजबूत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. तसेच ही नवीन ग्लास स्क्रीनवर सतत अनेक कारणांमुळे पडणाऱ्या ओरखड्यांपासून संरक्षण करण्यासाठी जुन्या ग्लासपेक्षा अधिक स्क्रॅचप्रूफ आहे.

अनेक कंपन्यांनी गोरीला ग्लास ६ वापरण्यास तयारी दर्शवली असून लवकरच ही ग्लास वापरून स्मार्टफोनची निर्मिती केली जाईल. या वर्षाअखेरीसपर्यंत गोरीला ग्लास ६ वापरून तयार करण्यात आलेले फोन बाजारात दाखल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.