करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. सामान्यांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. अनेकांना कंपन्यांनी घरुन काम करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉल करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण टाइमपास म्हणून गप्पा मारण्यासाठी तर अनेक ठिकाणी व्हिडिओ कॉलवरुन ऑफिसमधील लोक एकमेकांच्या संपर्कात आहेत. मात्र अनेक अ‍ॅप्लिकेशनवर मर्यादित लोकांना एकाच वेळी व्हिडिओ कॉल करता येणं शक्य आहे. त्यामुळेच आता ही अडचण सोडवण्यासाठी गुगलने पुढाकार घेतला आहे. गुगलचे व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप असणाऱ्या गुगल ड्युओने एकाच वेळेस व्हिडिओ कॉल करता येणाऱ्या युझर्सची संख्या वाढवली आहे. आता गुगल ड्युओच्या माध्यमातून एकाच वेळी १२ जणांना व्हिडिओ कॉल करता येणार नाही. आधी ही मर्यादा आठ इतकी होती.

गुगलचे वरिष्ठ मार्गदर्शक (प्रोडक्ट मॅनेजमेंट) सनाज अहरी लेमेलसन यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. “आपल्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी ड्युओचा वापर करणाऱ्यांचे आम्ही आभारी आहोतो. आम्हाला ठाऊक आहे सध्याच्या काळात व्हिडिओ कॉल अत्यंत महत्वपूर्ण सेवांपैकी एक आहे. म्हणूनच आम्ही आज ग्रुप कॉलिंगची मर्यादा आठवरुन बारापर्यंत वाढवली आहे,” असं ट्विट लेमेलसन यांनी केलं आहे. भविष्यात यामध्ये आणखीनही बदल केले जातील असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

इतर अ‍ॅप्सनेही वाढवली मर्यादा

आता गुगल ड्युओवरुन १२ जण तर व्हॉट्सअॅपवरुन चार जणांना एकाच वेळी व्हिडिओ कॉलवर बोलता येणार आहे. काही अ‍ॅपच्या मदतीने तर एकाच वेळी १०० जणांना कॉल करता येतो. अ‍ॅपलच्या फेसटाइप अ‍ॅपवर एकाचवेळी ३२ तर स्काइप आणि फेसबुक मेसेंजरवर एकाच वेळी ५० जणांशी व्हिडिओ कॉलवर बोलता येते. तर झूम अ‍ॅपमध्ये एकाच वेळी १०० जण व्हिडिओ कॉल करु शकतात.

गुगल ड्युओमध्ये १२ जणांना व्हिडिओ कॉल करण्याचे फिचर अक्टिव्ह झालं आहे. मात्र करोनाच्या साथीनंतर ही मर्यादा पुन्हा आठ करण्यात येणार आहे का याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मागील वर्षीच गुगलने ड्युओवरील चार जणांची मर्यादा वाढवून आठ केली होती. तसेच गुगलने आपल्या जी सूटमध्ये सहभागी होणाऱ्यांची मर्यादा नुकतीच २५० पर्यंत वाढवली होती.