‘लॉकडाउन’दरम्यान देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी दिलासादायक वृत्त आलं आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या गाड्यांचं उत्पादन पुन्हा सुरू करणार आहे. कंपनी हरयाणाच्या मानेसर येथील कारखान्यामध्ये प्रोडक्शन घेण्यास पुन्हा सुरूवात करणार आहे.

बुधवारी (दि.6) याबाबत मारुती सुझुकीकडून माहिती देण्यात आली. यापूर्वी 22 एप्रिल रोजीच हरयाणा सरकारने काही निर्बंधांसह मारुतीला मानेसर कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण, त्यावेळी कंपनीने नकार दिला होता. मात्र, आता सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 12 मे पासून मानेसर कारखान्यातील प्रोडक्शन घेण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती मारुती सुझुकीने दिली आहे.

22 मार्चपासून देशभरात लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर मारुतीचं प्रोडक्शन पूर्णतः बंद आहे. हरयाणा सरकारने 22 एप्रिल रोजी मारुती सुझुकीला 4,696 इतक्या मर्यादित कामगारांसोबतच कारखाना सुरू करण्याच्या अटीवर परवानगी दिली होती. पण त्यावेळी, “जोपर्यंत कंपनीच्या सर्व वेंडर कंपन्यांना उत्पादनाची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत गाड्यांचं उत्पादन सुरू करता येणार नाही. कारचं उत्पादन घेण्यासाठी अन्य अनेक घटकांची व साहित्याची आवश्यकता असते. त्यासाठी हजारो विक्रेत्यांना उत्पादन सुरू करावे लागेल. असं काही होण्याची सध्यातरी शक्यता नाही, कारण त्यांच्यातील अनेकजण रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला साहित्याचा सर्व संच मिळू शकत नाही. रिटेल दुकानेही अद्याप सुरू झालेली नाहीत. विक्री सुरू नसेल तर तुम्ही उत्पादन सुरू करु शकत नाही” असे सांगत कंपनीने मानेसरमध्ये प्रोडक्शन सुरू करण्यास नकार कळवला होता. मात्र, आता लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक शहरांमध्ये निर्बंध शिथील झाल्यानंतर कंपनीने 12 मे पासून पुन्हा प्रोडक्शन सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.