जगातील ५० कोटींपेक्षा जास्त फेसबुक खातेदारांची माहिती हॅकर्सच्या एका वेबसाईटवर उपलब्ध असल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर त्यावर फेसबुककडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. आता सापडलेली माहिती जुनी असल्याचं कंपनीने एका निवेदनाद्वारे म्हटलं आहे. आता जी माहिती सापडली आहे ती, २०१९ मधील आहे. आम्ही ऑगस्ट २०१९ मध्येच माहितीची चोरी होणार नाही अशी सुविधा फेसबुक खात्यांमध्ये दिली आहे, असा दावा फेसबुकने केला आहे.

५० कोटींपेक्षा जास्त फेसबुक खातेदारांचा माहिती संच हॅकर्सच्या एका वेबसाईटवर उपलब्ध असल्याची माहिती सर्वप्रथम बिझिनेस इन्सायडरने दिली. त्या प्रकाशनाने म्हटले की, आमच्याकडे १०६ देशांतील वापरकर्त्यांची माहिती आली असून त्यात फोन क्रमांक, फेसबुक आयडी, पूर्ण नावे, ठिकाण, जन्मतारीख, इमेल पत्ते यांचा समावेश आहे. फेसबुक माहिती सुरक्षेसाठी धडपडत असताना त्यांनी २०१८ मध्ये एक महत्त्वाची सुविधा रद्द केली होती. त्या सुविधेच्या मदतीने दुसऱ्याची माहिती फोन क्रमांकाच्या माध्यमातून शोधता येत असे. यातून केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका या राजकीय माहिती आस्थापनेने ८ कोटी ७० लाख फेसबुक वापरकर्त्यांची माहिती त्यांच्या परवानगीशिवाय गोळा केली होती. डिसेंबर २०१९ मध्ये युक्रेनच्या माहिती सुरक्षा संशोधकांना फेसबुक वापरकर्त्यांचे फोन क्रमांक, आयडी असा माहिती संच सापडला होता. एकूण २ कोटी ६७ लाख लोकांची ही माहिती होती. ती इंटरनेटवर खुलेपणाने उपलब्ध होती. अलीकडे सापडलेल्या माहितीचा त्या माहितीसंचाशी काही संबंध आहे का याचा तपास केला जात आहे.

फेसबुकचा दावा :-
दरम्यान, कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्क येथे मुख्यालय असलेल्या फेसबुकने, आता जी माहिती सापडली आहे ती, २०१९ मधील आहे. आम्ही ऑगस्ट २०१९ मध्येच माहितीची चोरी होणार नाही अशी सुविधा फेसबुक खात्यांमध्ये दिली आहे, असा दावा केला आहे.