दिल्ली उच्च न्यायालयाने तायवानची स्मार्टफोन निर्माता कंपनी ASUS ला जबर दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने भारतात आसुसच्या ‘Zen’ आणि ‘Zenfone’ या ट्रेडमार्कच्या उपकरणांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.

आसुस कंपनीवर ‘Zenfone’ नावाने किंवा या नावाशी साधर्म्य असणाऱ्या नावाने कोणतंही उपकरण विकण्यास बंदी घालावी यासाठी टेलिकेअर नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने आसुसला दणका दिला आणि ‘Zen’ आणि ‘Zenfone’ या ट्रेडमार्कच्या उपकरणांच्या विक्रीवर बंदी घातली. उच्च न्यायालयाने 28 मे 2019 पासून झेन किंवा झेनफोनच्या कोणत्याही उपकरणाची विक्री करु नये असे स्पष्ट आदेश आसुसला दिले. याप्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलै 2019 रोजी होणार आहे.

व्यापार चिन्ह अधिनियम1999 अंतर्गत (ट्रेड मार्क्स अॅक्ट) टेलिकेयर नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ‘Zen’ आणि ‘Zenfone’ या ट्रेडमार्कची नोंदणी केली होती. याअंतर्गत ते फीचर फोन, स्मार्टफोन, टॅबलेट आणि अॅक्सेसरीजची विक्री करणार होते. पण 2014 मध्ये आसुस कंपनीने ‘Zenfone’ ट्रेडमार्कसह निर्माण केलेले स्मार्टफोन बाजारामध्ये सादर केले. यानंतर टेलिकेयर नेटवर्कने आसुस कंपनीविरोधात याचिका दाखल केली होती. आसुस कंपनीने एकाच नावाच्या ट्रेडमार्कचा वापर केल्याने भारतीय ग्राहकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार होतंय असा आरोप त्यांनी आसुसवर केला. तर, झेनफोन सीरिजचं नाव प्राचीन झेन फिलॉसफीच्या आधारे ठेवलंय असा बचाव आसुसने दिल्ली उच्च न्यायालयात केला होता.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने आसुस कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. कारण, झेनफोन सीरिज त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या स्मार्टफोनपैकी एक आहे.