४० हजार जणांना लागण झाल्याची आरोग्य विभागाची माहिती या वर्षी देशभरात डेंग्यूमुळे ८० जणांचा मृत्यू ओढवला असून सप्टेंबपर्यंत ४० हजार जणांना त्याची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (एनव्हीबीडीसीपी) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा ३० सप्टेंबपर्यंत देशात डेंग्यूमुळे ८३ जणांचा मृत्यू झाला, तर ४० हजार ८६८ जणांना त्याची लागण झाली. डासांपासून प्रसार होणाऱ्या या रोगामुळे गेल्या वर्षी देशात ३२५ जणांचा मृत्यू झाला होता, तसेच एक लाख ८८ हजार ४०१ जणांना लागण झाली होती, असे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

यंदा ३० सप्टेंबपर्यंत केरळमध्ये ३५ जणांचा डेंग्यूमुळे बळी गेला, तर तीन हजार ६६० जणांना या रोगाची लागण झाली. याच कालावधीत महाराष्ट्रात या रोगाने १८ जणांना जीव गमवावा लागला, तर चार हजार ६६७ लोकांना त्याची लागण झाली, असे या आकडेवारीवरून दिसते.

यंदा छत्तीसगडमघ्ये डेंग्यूने १० जणांचा मृत्यू झाला, तर एक हजार ९८३ जणांना त्याची लागण झाली. याच दरम्यान दिल्लीत एक हजार १५६ जणांना या रोगाची लागण झाली. पण, येथे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. दिल्ली महापालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात अलीकडील काळात डेंग्यूचे निदान झालेले ८३० रुग्ण आढळल्याचे म्हटले आहे.