वाढत्या वयासोबत येणाऱ्या बहिरेपणावर वेळीच योग्य उपचार केल्यास वृद्धावस्थेतील नैराश्यावर मात करण्यास मदत होते, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अनेकदा अशा प्रकारच्या बहिरेपणावर पुरेसे उपचार केले जात नाहीत.
‘जेएएमए ओटोलॅरिंगोलॉजी-हेड अॅन्ड नेक सर्जरी’ या पत्रिकेत याबाबतचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. वाढत्या वयाबरोबर येणाऱ्या बहिरेपणात नैराश्याची अधिक चिन्हे दिसून येतात, असे त्यात म्हटले आहे.
याबाबत अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील सहायक प्राध्यापक आणि या अभ्यासाचे प्रमुख लेखक जस्टीन एस. गोलब म्हणाले की, सत्तरी ओलांडलेल्या बहुतांश लोकांमध्ये कमीत कमी सौम्य स्वरूपाचे तरी बहिरपण आढळून येते. पण, त्यापैकी काही जणांच्याच समस्येचे निदान होते आणि त्याहूनही कमी जणांवर उपचार केले जातात. बहिरेपणाचे निदान आणि उपचार सोपे आहेत. या उपचारांमुळे त्या व्यक्तीमधील नैराश्यावर मात करता येत असेल, तर अशा उपचारांचे महत्त्व आणखी वाढते, असे त्यांनी सांगितले.
वयासोबत ऐकण्याची क्षमता कमी होणे, ही वृद्धांमधील तिसरी मोठी समस्या आहे. त्यातूनच विस्मरण, स्मृतिभ्रंश यासारखे विकार जडण्याची शक्यता असते. अर्थात ज्येष्ठ नागरिकांतील बहिरेपणा आणि त्यांच्यातील नैराश्याचा काही संबंध आहे काय, हे स्पष्ट करणारे विस्तृत अभ्यास हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच झाले आहेत. विशेषत: ‘हिस्पॅनिक्स’ समुदायात (स्पेनमधून आलेले, विशेषत: लॅटिन अमेरिकेशी संबंधित गट) भाषिक-सांस्कृतिक अडसर आल्याने नैराश्याचे पुरेसे निदान होत नाही. या समुदायातील पन्नाशी पार केलेल्या पाच हजार २३९ व्यक्तींच्या आरोग्याच्या तपशिलाचा संशोधकांनी अभ्यास केला. त्यांची श्रवणक्षमता चाचणी करून नैराश्याची लक्षणे तपासण्यात आली. योग्य श्रवण क्षमता असलेल्या व्यक्तींच्या तुलनेत सौम्य बहिरेपण असलेल्या व्यक्तींमध्ये नैराश्य निर्माण होण्याची दुप्पट शक्यता असते. तीव्र बहिरेपण असलेल्या व्यक्तींमध्ये ही शक्यता चौपट असल्याचे आढळून आले. असे असले तरी बहिरेपणामुळे नैराश्याची लक्षणे दिसून येतात, असे या संशोधकांना सिद्ध करता आले नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 6, 2019 12:11 am