सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विविध विकारांचे निदान करण्यासाठी स्मार्टफोनचा उपयोग केला जातो.
अमेरिकी शास्त्रज्ञांनी तयार केलेले एक उपकरण जर स्मार्टफोनला जोडले तर तुम्हाला मधुमेहाचेही निदान होऊ शकते. लाळेचे नमुने घेऊन काही सेकंदांत मधुमेहाचे निदान करणारे हे उपकरण असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
टाइप दोन प्रकारच्या मधुमेहाचे निदान यात जैविक निदर्शकाच्या मदतीने करता येते व कमी उत्पन्न गटातील लोकांना मधुमेहाचे हे निदान कमी खर्चात करता येईल.
हा निदान संच सेलफोनला जोडता येतो व कुठल्याही सुया न टोचता मधुमेह शोधता येतो. यात एक काट्र्रिज असून ते मोबाइल फोनला जोडले जाते व एक विशिष्ट संयुग लाळेत दिसते की नाही याची निश्चिती केली जाते. हल्ली एखाद्या स्त्रीला गर्भ राहिला की नाही याची चाचणी जितकी सहज एका पट्टीवर करता येते तितकी सोपी ही चाचणी असून काही सेकंदांत रोगाचे निदान होते, असे मेक्सिकन विद्यापीठाचे मार्को अँडोनियो रायईट पालोमारेस यांनी सांगितले.
लाळेत जर संबंधित जैविक घटक असेल तर विशिष्ट प्रकारचा प्रकाश सेलफोनचा कॅमेऱ्यात नोंदला जातो.
या संशोधनात ह्य़ूस्टन विद्यापीठाचाही सहभाग असून हे छोटे यंत्र मोबाइलला जोडून मधुमेह आहे की नाही हे समजते. निदानाचा निकाल आपल्याला सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोबाइलवर दिसतो.
जीवशास्त्रात इतर कारणांसाठीही या तंत्राचा वापर करता येणार आहे. मधुमेहाची चाचणी अशा पद्धतीने आपल्या आवाक्यात येत असून ती घरच्या घरी करता येईल. त्यातील सोपेपणा हे वेगळे वैशिष्टय़ आहे. जैवनिदर्शक प्रकाशित स्वरूपात दिसत असल्याने त्यातील अचूकता व दृश्यताही या चाचणीला विश्वार्हता देणारी आहे.