मधुमेह झालेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची जोखीम तुलनेत जास्त प्रमाणात असते. हा धोका टाळण्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे, तसेच जीवनशैलीतही आवश्यक ते बदल केले पाहिजेत, असा सल्ला आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

भारतामध्ये सहा कोटी ९२ लाख लोकांना मधुमेह जडलेला आहे. त्यामुळे मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या जगभरातील दहा देशांत भारताचा समावेश होतो, असे आंतरराष्ट्रीय मधुमेह संघाच्या (इंटरनॅशनल डायबिटिस फेडरेशन) मधुमेह आराखडय़ावरून स्पष्ट होते. भारतात मधुमेह झालेल्या लोकांशिवाय आणखी तीन कोटी ६५ लाख लोकांमध्ये मधुमेहाची प्रारंभिक लक्षणे दिसून येतात.

याबाबत कालरा रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आर. एन. कालरा यांनी सांगितले की, मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांची हानी होत असल्याने त्या व्यक्तीला हृदयरोग होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांप्रमाणेच मधुमेह झालेल्या लोकांनीही तितक्याच नियमितपणे आणि दक्षतेने त्यांना असलेल्या हृदयरोगांच्या जोखमीची तपासणी करून घेतली पाहिजे.

बीएलके सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे एण्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अजयकुमार अजमानी म्हणाले की, ज्यांना मधुमेह झाला आहे, त्या रुग्णांना तरुण वयातही हृदयरोग होण्याची जोखीम असते, हे अनेक अभ्यासांतून सिद्ध झालेले आहे.

एका नव्या अभ्यासानुसार, ज्या लोकांमध्ये मधुमेहाचे निदान झालेले नाही, त्यांना तर हृदयविकाराचा धक्का बसण्याची जोखीम अधिक असते. त्यामुळे नियमित आरोग्य तपासण्यांतून मधुमेहाबाबत माहिती घेतल्यास हृदयविकार होण्याचा धोकाही कमी करता येऊ शकतो, असे डॉ. अजयकुमार यांनी निदर्शनास आणले.