सामान्य मधुमेह आणि उच्च रक्तदाबावरील उपचारासाठी घेण्यात येणारी औषधे एकत्रित घेतल्यामुळे शरीरातील कर्करोगाच्या पेशी मोठय़ा प्रमाणात नष्ट होत असल्याचा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

मेटफोर्मिन हे औषध मधुमेहाच्या प्रकार दोनसाठी सर्रास वापरले जाते. यामुळे शरीरातील साखरेची पातळी कमी होते. मात्र याचसह यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असून हे औषध शरीरातील कर्करोगाच्या पेशींना नष्ट करत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. मेटफोर्मिनसारख्या उच्च रक्तदाबविरोधी औषधांमध्ये कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्याची क्षमता आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेह या औषधांच्या एकत्रित घेण्यामुळे शरीरातील कर्करोगाच्या पेशी नष्ट होत असल्याचे स्वित्र्झलडस्थित बसेल विद्यापीठातील संशोधक मायकेल हॉल यांनी म्हटले आहे.

मधुमेहविरोधी औषधांची मोठी मात्रा शरीरात गेल्यामुळे कर्करोगांच्या पेशी नष्ट होण्यास मदत होत असली तरीही जास्त प्रमाणात औषधाची मात्रा शरीरात गेल्यामुळे त्याचे इतर दुष्परिणाम दिसून येतात.

संशोधकांनी कर्करोगविरोधी शंभरपेक्षा अधिक औषधांचा अभ्यास केला. यामध्ये जर मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची औषधे एकत्रित केल्यास कर्करोगाच्या पेशी मोठय़ा प्रमाणात नष्ट होत असल्याचे संशोधकांना आढळून आले. उदा. रक्तातील कर्करोग झालेल्या रुग्णाला हे एकत्रित औषध दिल्यास त्याच्यातील पेशींच्या सर्व गाठी नष्ट झाल्याचे दिसून आले. तसेच याचा इतर साधारण पेशींवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे अभ्यासात दिसून आल्याने संशोधकांनी माहिती देताना सांगितले. हे संशोधन ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)