चीज हा युरोपीय देशांमधील लोकांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच स्वयंपाकातही चीजचा वापर भरपूर प्रमाणात होतो. गाय, म्हैस, शेळी आणि बकरी यांच्या दुधापासून चीज तयार केलं जातं. दूध फाटल्यानंतर त्यातून पाणी आणि घन पदार्थ वेगळे करतात. याच घन पदार्थांपासून चीज बनतं. या चीजचे हार्ड चीज, सॉफ्ट चीज, शेव्र, ब्लू व्हेन्ड चीज, फ्लेवर्ड चीज असे अनेक प्रकार आहेत. पार्मेसन, चेडार, मॉझरेला अशा असंख्य प्रकारांचा समावेश आहे. या सगळ्या चीजच्या प्रकाराबद्दल बोलण्याचं कारण काय?, असा प्रश्न तुमच्या डोक्यातही आला असेलच. ग्रेट ब्रिटीश चीज कंपनीने एक नवीन प्रकाराचं चीज बनवल्यामुळे या चर्चेला सुरूवात झाली आहे.

साल्मन पिंक म्हणजेच गुलाबी रंगाची छटा असलेल्या चीजनं आपल्या रंगामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चीजचा रंगच इतका आकर्षक आहे की, एखाद्याला ते खाण्याचा मोह झाला नाही तर नवल. या चीजची चव व्हाईट वाईनसारखी असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. तर आकर्षक गुलाबी रंगासाठी यात रासबेरीच्या अर्काचाही वापर करण्यात आला आहे. या कंपनीने आणखी एका चीजची निर्मीती केली आहे. चेडार चीज आणि दक्षिण अमेरिकेत उगवणाऱ्या मिरच्यांच्या वापर करून या कंपनीनं पेरीपेरी चीजही बनवलं आहे.

काही महिन्यांपूर्वी स्वित्झर्लंडच्या कंपनीनं गुलाबी रंगाचं चॉकलेटही तयार केलं होतं. रुबी कोकोआ बीन्सपासून हे चॉकलेट तयार करण्यात आले. चॉकलेटचा हा चौथा प्रकार आहे. ‘डार्क चॉकलेट’, ‘व्हाइट चॉकलेट’, ‘मिल्क चॉकलेट’ असे चॉकलेटचे चार प्रकार अस्तित्त्वात होते. यानंतर ८० वर्षांनंतर चॉकलेटचा नवा प्रकार अस्तित्त्वात आला.