मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा चीनची मोटरसायकल कंपनी CFMoto च्या भारतातील पदार्पणावर देखील परिणाम झाला आहे. CFMoto कंपनी आज अर्थात 4 जुलै रोजी भारतीय बाजारात 4 बाइक लाँच करणार होती. त्यासाठी मुंबईत एका इव्हेंटचंही आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, मुंबईतील खराब हवामान आणि मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे कंपनीने हा इव्हेंट पुढे ढकलला आहे.
CFMoto कंपनी बंगळुरूच्या एएमडब्ल्यू मोटरसायकल्ससोबत भागीदारीसह या नव्या बाइक भारतात लाँच करणार आहे. दरम्यान, खराब हवामानामुळे इव्हेंटमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन मुंबईतील इव्हेंट रद्द केल्याची माहिती कंपनीने दिली. भारतीय हवामान खात्याने 5 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, नवा इव्हेंट पुन्हा केव्हा असणार याबाबत नेमकी माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. तरी जुलै महिन्याअखेरपर्यंत या चारही बाइक्स भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
चीनची मोटरसायकल कंपनी CFMoto भारतात 300NK, 650NK, 650MT आणि 650GT या चार बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे. या चारही बाइक भारतात असेंबल न करता येतील त्यामुळे भारतात येणाऱ्या CFMoto मधील फीचर्स आंतरराष्ट्रीय बाजारातील मॉडलप्रमाणेच असतील अशी शक्यता आहे.
एनके300 –
सीएफमोटो एनके300 ही कंपनीची सर्वात परवडणारी बाईक असणार आहे. यात 292.4cc क्षमतेचं इंजिन असून हे इंजिन 34hp ची ऊर्जा आणि 20.5Nm टॉर्क निर्माण करतं. या बाईकमध्ये टीएफटी एलसीडी डिस्प्ले, अॅलॉय व्हिल्स, स्प्लिट सीट्स आणि एलईडी हेडलँपसह अन्य फीचर्स आहेत. केटीएम 250 ड्यूक आणि होंडा सीबी 300आर यांसारख्या बाईक्ससोबत एनके300 ची स्पर्धा असू शकते.
तीन बाईकमध्ये एकच इंजिन –
याशिवाय तिन्ही बाईकमध्ये 649.3cc क्षमतेचं इंजिन असणार आहे. मात्र सर्व बाईकमधील इंजिनचं पावर आउटपुट वेगवेगळं आहे. यातील 650NK चा टॉप स्पीड 180 किलोमीटर प्रतितास इतका असेल. तर 650MT अॅडव्हेंचर-टूरिंग आणि 650GT स्पोर्ट्स लुक असलेली सेमीफेअर्ड टूरर बाइक आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 4, 2019 11:43 am