News Flash

सौंदर्यभान : इलेक्ट्रोक्वाट्री

यात विशिष्ट विद्युत प्रवाहाचा वापर करून त्वचेच्या विकृतींवर उपचार करता येतो.

डॉ. शुभांगी महाजन

त्वचेवरील तीळ, मस्सा, वॉर्ट (एचपीव्ही इन्फेक्शन), स्किन टॅग यांसारख्या समस्यांमुळे निराश आहात? मग आता चिंता सोडा आणि जाणून घ्या इलेक्ट्रोक्वाट्री उपचार पद्धतीबद्दल.

इलेक्ट्रोक्वाट्री उपचार पद्धती म्हणजे काय?

इलेक्ट्रोक्वाट्री याला थर्मल क्वॉट्री असेही म्हणतात. ही अगदी सोपी, जलद आणि कमी वेळेत होणारी उपचारपद्धती आहे. यात विशिष्ट विद्युत प्रवाहाचा वापर करून त्वचेच्या विकृतींवर उपचार करता येतो.

इलेक्ट्रोक्वाट्री प्रक्रिया कसे कार्य करते?

सर्वात आधी संबंधित त्वचेचा भाग अल्कोहोल लावून साफ केला जातो. त्यानंतर ती जागा इंजेक्शनद्वारे किंवा सुन्न करणाऱ्या क्रीमद्वारे बधिर केली जाते. इलेक्ट्रोक्वाट्री हे एक पेनसारखे उपकरण आहे, ज्याच्या टोकावर सुईच्या आकाराचे धातूपासून बनविलेले प्रोब बसविलेले असतात. या प्रोबद्वारे उच्च वारंवारतेचा विद्युतप्रवाह लक्षित केंद्रावर वितरित केला जातो. यामुळे त्वचा गरम होते व पृष्ठभागावरील नको असलेल्या पेशींना जाळून टाकते. या प्रक्रियेदरम्यान होणारा रक्तस्राव थांबविण्यासाठी वेगळ्या प्रोबचा वापर करून सामान्य त्वचेच्या पेशींवर उच्च विद्युतप्रवाह सोडला जातो. उपचार केलेल्या भागात एक जखम तयार होते, जिचा आकार रुग्णाच्या त्वचेच्या प्रकारावर, लक्षित भागाच्या आकारमानावर आणि उपचारांच्या आक्रमकतेवर अवलंबून असतो. ही जखम दोन ते तीन आठवडय़ांत भरून निघते. मोठय़ा किंवा अधिक काळ राहाणाऱ्या जखमांना पुन्हा उपचारांची आवश्यकता भासू शकते. प्रकियेनंतर ताबडतोब त्या ठिकाणी अँटिबायोटिक मलम लावून त्यावर ड्रेसिंग केले जाते.

त्यानंतर खालील काळजी घेणे आवश्यक

* जखम लवकर बरी होण्यासाठी २४ ते २८  तास कोरडीच ठेवावी. ओली करू नये.

* त्यानंतर जखमेचा भाग स्वच्छ करण्यासाठी कोमल साबण आणि पाण्याचा वापर करता येऊ  शकतो.

* दररोज दोनदा अँटिबायोटिक क्रीम आणि मॉयश्चरायझर लावणे गरजेचे आहे.

* एकदा जखम बरी झाल्यावर त्वचेला  सूर्यप्रकाशापासून वाचवणे गरजेचे आहे. त्यासाठी किमान एसपीएफ ३० असलेला सनस्क्रीन वापरावा.

दुष्परिणाम

* इलेक्ट्रोक्वाट्री ही एक अत्यंत सुरक्षित प्रक्रिया आहे. त्यामुळे गंभीर दुष्परिणाम सहजासहजी दिसून येत नाहीत.

* प्रक्रियेदरम्यान होणारे दुष्परिणाम (उदा. जळजळ, वेदना किंवा सभोवतालच्या त्वचेवर येणारा लालसरपणा ) तात्पुरते राहतात आणि दोन ते तीन दिवसांत आपसूक बरे होतात.

* उपचारांनंतर व्रण, पांढरे अथवा काळे डाग सहजासहजी दिसून येत नाहीत.

* रक्त जैवसंक्रमणाचा धोका संभवत नाही.

* डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन न केल्यास जखमेवर इन्फेक्शन होऊन जखम बरी होण्यास अधिक कालावधी लागू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 3:25 am

Web Title: electrocautery zws 70
Next Stories
1 तुपामुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग, हे फायदे नक्की वाचा
2 कापूराच्या वापरामुळे ‘या’ शारीरिक समस्या होतील दूर; जाणून घ्या फायदे
3 200 पेक्षा कमी किंमतीत 42GB पर्यंत डेटा, Reliance Jio चे बेस्ट प्रिपेड प्लॅन्स
Just Now!
X