आयुर्वेद हे भारतीय पुरातन शास्त्र असून त्यामध्ये दिवसेंदिवस अनेक बदल होताना दिसत आहेत. एक समग्र जीवनप्रणाली तसंच वैद्यकीय उपचार पद्धती म्हणून या शास्त्राची ओळख आहे. मात्र प्रचार आणि प्रसारापासून हे शास्त्र काहीसे मागे राहीले आहे. त्यामुळे त्याचा प्रचार करण्याची आवश्यकता आहे. नेमके हेच ओळखून ‘असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स’ (आप) या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या राष्ट्रीय संघटनेने ‘आयुष’ मंत्रालय आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण खाते यांच्या सहकार्याने ‘आपकॉन’ २०१८ या परिषदेचे आयोजन केले आहे.

देशभरातील सुमारे ८०० आयुर्वेदिक डॉक्टर्स यांच्यासह आयुर्वेदाशी संबंधित सरकारचे विविध विभाग व खात्यांचे उच्चाधिकारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयुर्वेदातील तज्ज्ञ मंडळी या परिषदेत ‘आयुर्वेद आणि औद्योगिक नातेसंबंध’, ‘कॉर्पोरेट रुग्णालयात आयुर्वेदासाठीच्या संधी’, ‘आयुर्वेदासाठी फार्मास्युटिकल कंपन्यांची भूमिका’, ‘आयुर्वेद आणि आरोग्य विमा’ यांसारख्या थोड्या वेगळ्या स्वरुपाच्या विषयांवर आपले अभ्यासपूर्ण व संशोधनपर प्रबंध वाचणार आहेत. याबरोबरच ‘पंचकर्मा’बाबत या परिषदेत एक लाइव्ह कार्यशाळाही घेतली जाणार आहे, अशी माहिती असोसिएशन ऑफ आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नीलेश दोशी यांनी दिली.

“आयुर्वेदाचे विविध पैलू आणि त्यापासून होणारे लाभ यासंदर्भात या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धती-थेरपी आणि औषधे यांचे स्टॅंडर्डायजेशन करण्याच्या दृष्टीनेही ही परिषद अत्यंत महत्वाची ठरणार आहे. गंभीर आजारग्रस्त रुग्णांना पर्यायी वैद्यकीय उपाययोजनांसंबंधीची माहिती या परिषदेत मिळेल”, असंही डॉ. नीलेश दोशी यांनी सांगितले.