करोना व्हायरसबाबतच्या फेक न्यूज आणि अफवांना फिल्टर करणाऱ्या ‘अल्गोरिदम’मध्ये आलेल्या एररमुळे अनेक युजर्सना सोशल मीडिया वेबसाइट फेसबुककडून चुकून बॅन केलं जात होतं. मार्च महिन्याच्या सुरूवातीला फेसबुकवर करोना व्हायरविरोधातील लढ्यासाठी होम-मेड मास्क बनवण्याची ट्रेनिंग देणाऱ्या अनेक युजर्सना बॅन केल्याचा अलर्ट मिळाला, तसेच त्यांच्या पोस्ट देखील हटवण्यात आल्या. पण आता न्यू-यॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, फेसबुकने तो अल्गोरिदमचा एरर असल्याचं म्हटलंय, तसेच युजर्सची माफीही मागितली आहे.

करोना व्हायरसच्या दहशतीचा फायदा उठवत मास्क आणि सॅनिटायझर विकून कमाई करणाऱ्या युजर्सना लगाम घालण्यासाठी आणि त्यांचे कंटेंट ब्लॉक करण्यासाठी फेसबुकने नवीन ऑटोमॅटिक सिस्टिम आणली आहे. पण, त्या सिस्टिमच्या अल्गोरिदममध्ये एरर आल्याचा फटका अनेक युजर्सना बसला. याबाबत स्पष्टीकरण देताना, “करोना व्हायरसबाबतच्या फेक न्यूज आणि अफवांना फिल्टर करणाऱ्या ‘अल्गोरिदम’मध्ये आलेल्या एररमुळे कंटेंट ब्लॉक केले जात होते. सिस्टिममध्ये पुन्हा अशी चूक होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जे युजर्स चांगलं कार्य करतायेत त्यांना रोखण्याचा किंवा बॅन करणण्याचा आमचा कोणताच प्रयत्न नाही”, असं कंपनीने म्हटलं आहे.

करोना व्हायरसविरोधातील लढ्यामध्ये घरबसल्या मास्क कसे बनवावे याबाबतची विविध माहिती, व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी फेसबुकवर शेअर केले होते. पण अशा अनेक युजर्सनी अपलोड केलेल कंटेंट फेसबुकने हटवले होते आणि त्यांना प्लॅटफॉर्मवरुन बॅन केले जाण्याचा अलर्टही मिळाला होता. अनेक युजर्सनी याबाबतची तक्रारही केली होती. याशिवाय Sew Face Masks नावाच्या हजारो फॉलोअर्स असलेल्या एका ग्रुपलाही बॅन करण्याचा अलर्ट पाठवण्यात आला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना फेसबुकने युजर्सची माफी मागितली आहे.