केंब्रिज अॅनालिटीका डेटा लिक प्रकरणानंतर फेसबुकनं जगभरातील युजर्सचा चांगलाच रोष ओढावून घेतला होता. इतकंच नाही तर ‘डिलिट फेसबुक’ सारखी मोहीमही फेसबुकविरोधात राबवली गेली होती. याचा मोठा फटका फेसबुकला बसला. त्यामुळे आता फेसबुक कंपनी युजर्सचा गमावेला विश्वास परत मिळवण्यासाठी तसेच युजर्सनां फेसबुक वापरण्यासाठी अधिक सुलभ व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून फेसबुकनं काही महत्त्वाच्या फीचर्सची घोषणा करायला सुरूवात केली आहे. आता फेसबुकनं चांगल्या आठवणींचा लेखाजोखा मांडणाऱ्या नव्या फीचर्सची घोषणा केली आहे. त्यामुळे यापुढे युजर्सना चांगल्या आठवणी जतन करता येणार आहे. यासाठी वेगळं पेज युजर्सला त्यांच्या आकाऊंटवर उपलब्ध होणार आहेत.

आता फेसबुक नोटिफिकेशन इन्स्टाग्रामवरही येणार!

काही वर्षांपूर्वी फेसबुकनं ‘On This Day’ हे फीचर आणलं होतं. त्यानुसार त्या त्या दिवशी भूतकाळात शेअर केलेल्या जुन्या पोस्ट युजर्सना पुन्हा त्यांच्या वॉलवर शेअर करता येतात. हे फीचर्स अनेकांना खूपच आवडलं होतं. विस्मृतीत गेलेल्या बऱ्या वाईट आठवणी दरदिवशी फेसबुक घेऊन येतं. जगभरातील कोट्यवधी लोक दररोज जुन्या आठवणी रिपोस्ट करतात. आता याच जुन्या चांगल्या आठवणींचं वेगळं पेज तयार होत असल्यानं प्रत्येकाला भूतकाळातील आठवणी पुन्हा एकदा जगता येणार आहे. आठवणींचं वेगळं पेज असल्यानं युजर्सनां हव्या त्या वेळी या पेजवर जाऊन त्या पोस्ट पाहता येणार आहे.

याव्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे अपडेट्स यामध्ये करण्यात आले आहेत. ज्याचा फायदा युजर्सनां होणार आहे. शक्यतो ज्या आठवणींचा युजर्सनां त्रास होणार नाही त्या आठवणी पुन्हा न दाखवण्याचाही फेसबुक प्रयत्न करत आहे.