सोशल मीडियाचा वापर देशासह जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस या मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये वाढ होत असताना कंपनीकडून आपल्या युजर्सना अॅप किंवा वेबसाईट वापरणे जास्त सोपे व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कंपनीने नुकतीच आपल्या अॅपमध्ये काही बदल करण्याचे ठरवले असून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. काही बिझनेस पेजेसच्या संदर्भात हे बदल केले जाणार आहेत. यामुळे आणखी जास्त युजर्स फेसबुकशी जोडले जातील असे म्हटले जात आहे.

आता तुम्ही एखाद्या हॉटेलचे पेज पाहत असाल तर त्याठिकाणी तुम्हाला त्या हॉटेलमधील टेबल बुक करण्याचा पर्याय येणार आहे. याचप्रमाणे वेगवेगळ्या कॅटॅगिरीसाठी वेगवेगळ्या डिझाईनची पेजेस बनवली जाणार आहेत. यामध्ये टीव्ही शो पेज, रेस्तराँ पेज आणि इतर स्थानिक सुविधांची पेजेस बदलण्याचे काम सुरु आहे. याबरोबरच फेसबुकच्या रिकमेंडेशन या फिचरमध्येही बदल करण्यात येत आहेत. नव्या बदलांनंतर युजर्सना बाकी लोकांहून जास्त चांगले रिव्ह्यू आणि फिडबॅक मिळतील. याबरोबरच फेसबुक आपले जॉब प्लॅटफॉर्म सुधारण्यावरही काम करत आहे. याबरोबर लोकल नावाच्या एका सेक्शनमध्ये लोकांना आपल्या जवळची आपल्या आवडीच्या ठिकाणांची आणि गोष्टींची यादी मिळू शकेल.

प्रत्यक्षात आपल्याला दिसतील अशा फिचर्सचा विचार केला तर फेसबुकने असा खुलासा केला होता की कंपनीद्वारे आपले अँड्रॉईड आणि अॅपल अॅपमधील नेव्हीगेशन बार बदलला जाणार आहे. यामध्ये विविध पर्याय असतील मात्र आपण काय शोधतो आणि लाईक किंवा कमेंट करतो यानुसार आपल्याला ते पर्याय दिसू शकतील. म्हणजे तुम्ही मेसेजचा पर्याय जास्त वापरत असाल तर नेव्हीगेशन बारमध्ये तुम्हाला न्यूज फीड, नोटीफिकेशन आणि मेनूशिवाय मेसेजचा पर्याय आधी दिसेल.