सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook ने भारतात मंगळवारी आपले म्युझिक प्रोडक्ट्स लाँच केले. याद्वारे युझर्सना व्यक्त होण्याव्यतिरिक्त आपल्या प्रोफाईलमध्ये गाणीदेखील ठेवता येणार आहेत. फोटो शेअरींग अॅप इन्स्टाग्रामवरदेखील स्टोरीमध्ये म्युझिक स्टिकर, लिरिक्स, लिप सिंक लाइव्हसारख्या सुविधा वापरता येऊ शकतील.

नव्या फिचरद्वारे युझर्सना बॉलिवूडची गाणी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर टाकता येतील. सध्या फेसबुकचे हे फिचर 55 देशांमधील युझर्सना वापरता येत आहे. युझर्स फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर गाण्यांद्वारे एकमेकांशी जोडलं जावं आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या, अशी प्रतिक्रिया फेसबुक इंडियाचे संचालक आणि भागीदारी प्रमुख मनिष चोप्रा यांनी दिली. “युझर्सचा एक्सपिरिअंस आणखी चांगला करण्यासाठी फेसबुकने हे फिचर लाँच केले आहे. देशातील म्युझिक इकोसिस्टम उत्तम आहे. गाण्यांद्वारे युझर्स आपल्या भावना शेअर करू शकतील याचा आम्हाला आनंद आहे. नव्या फिचरसाठी आम्ही भारतातल्या म्युझिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे,” असंही चोप्रा म्हणाले.

आणखी वाचा : आता स्क्रीनशॉटद्वारे करता येणार Google Search

फेसबुकने याचवर्षी टी-सिरिज आणि अन्य म्युझिक कंपन्यांशी करार केला आहे. याअंतर्गत आपल्या म्युझिक लायसन्सचा वापर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर युझर्सना सोशल एक्सपिरिअन्स देण्यासाठी करण्यात येणार आहे. फेसबुक अॅपवर स्टोरीच्या फिचरचा वापर झपाट्याने वाढत आहे. स्टोरीवर म्युझिक स्टीकर सुरू करून आम्ही युझर्सना आपल्या मित्रपरिवाराशी जोण्याबरोबरच स्वत:ला व्यक्त होण्याचीही सुविधा देत असल्याची माहिती फेसबुकचे व्हिडीओ आणि म्युझिक प्रोडक्ट्सचे प्रमुख परेश राजावत यांनी दिली.