चंदेरी दुनियेचा फॅशन हा अविभाज्य घटक आहे. दिवसागणिक याठिकाणी फॅशन आणि ट्रेंड बदलतात आणि या इंडस्ट्रीमध्ये असलेल्यांना त्याप्रमाणे अपडेटही रहावे लागते. कलाकार कॅरी करत असलेल्या या फॅशनमागे अनेक हात आणि डोकी कार्यरत असतात. मात्र फार कमी वेळा त्यांचे नाव आपल्यापर्यंत पोहोचते. फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणे आणि आपले नाव कमावणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. पण पुण्यातील मराठमओळ्या परागने ही गोष्ट सिद्ध करुन दाखवली आहे. पराग जयसिंगपूरे या सहकारनगर येथे राहणाऱ्या तरुणाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

सुरुवातीला पराग मुळात चंदेरी दुनियेपासून काहीसा दूरच होता. परागच्या मते, आधी कुटुंबाची जबाबदारी घ्यावी आणि मग आपल्या स्वप्नांच्या मागे धावावे. त्याचप्रमाणे कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देत त्याने फ्रॅगरन्स डिझाइन्सची स्थापना केली. कल्पक अशा या क्षेत्रात सृजनशीलता आणि त्याला असणार कष्टांची जोड यामुळे त्याचा कमी कालावधीत चांगला जम बसला. बघता बघता त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अवघ्या दोन वर्षांमध्ये त्याने मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, पुष्कर जोग आणि बऱ्याच नावाजलेल्या कलाकारांसाठी ड्रेस डिझाईन केले.

पण एवढ्यावरच तो थांबला नाही, तर आता त्याने सध्याच्या मिसेस इंडिया – प्राईड ऑफ नेशन श्रीमती मयंका शर्मा-पटेल यांच्यासाठी काही ड्रेस तयार केले आहेत. मिसेस इंडिया – प्राईड ऑफ नेशन ही स्पर्धा दर वर्षी गुरुग्राम येथे आयोजित केली जाते. भारताच्या प्रत्येक राज्यातून गृहिणी यामध्ये भाग घेतात. “ह्या वर्षीच्या स्पर्धेसाठी मुंबईतील मिसेस इंडिया – प्राईड ऑफ नेशनची स्पर्धक निवडण्यासाठी झालेल्या स्पर्धेसाठी मी पराग जयसिंगपूरेनी तयार केलेले कपडे निवडले आहेत.” असे मागील वर्षीच्या विजेत्या श्रीमती मयंका शर्मा-पटेल म्हणाल्या. पाहता क्षणीच मला ते कपडे आवडले आणि आम्ही एकत्र काम करण्याचे ठरवले. माझ्या उंचीमुळे बऱ्याच डिझायनर्सनी माझ्यासाठी स्टाईल करण्याचे नाकारले, पण परागने मला खूप सकारात्मक पाठिंबा दिला.

पराग जयसिंगपूरे म्हणाला, मराठी चित्रपट सृष्टी तसेच काही कलाकारांची वैयक्तिक वेशभूषा करताना आव्हानांची जाणीव झाली. त्यातूनच पुढे शिकत गेलो. आता प्रवास सुरु केला आहे आणि बाप्पाच्या कृपेने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने लवकरच मराठीच नव्हे तर इतर चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा काम सुरु होईल असा विश्वास आहे.”