FAU-G मोबाइल गेमचं अखेर गुगल प्ले स्टोअरवर आगमन झालंय. लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG Mobile वर बंदी आल्यापासून युजर्स FAU-G या मेड इन इंडिया गेमच्या प्रतीक्षेत आहेत. FAU-G मोबाइल गेम अजूनही लाँच झालेला नाही, पण आता हा गेम Google Play Store वर प्री-रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध झालाय. सुरूवातीला हा गेम केवळ अँड्रॉइड युजर्ससाठीच येण्याची शक्यता आहे, कारण अद्याप अ‍ॅपलच्या App Store वर प्री-रजिस्ट्रेशन सुरू झालेलं नाही.

FAU-G, अर्थात फिअरलेस अँड युनाइटेड गार्ड्स हा गेम आता प्री-रजिस्ट्रेशनसाठी Google Play स्टोअरवर उपलब्ध आहे. रजिस्टर करणाऱ्या प्लेयर्सना गेम लाँच होताच पुश नोटिफिकेशन पाठवलं जाईल, त्यानंतर युजर्सना गेम डाउनलोड आणि इंस्टॉल करता येईल. या गेमची साइज किती असेल आणि व्हर्जन कोणतं असेल याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र प्ले-स्टोअरवरील लिस्टिंगद्वारे गेमच्या स्टोरीलाइन आणि गेम-प्लेबाबत थोडी माहिती देण्यात आली आहे. गेमच्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता लिस्टिंग पेजवरुन पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल असं दिसतं. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.