अंगावर टॅटूज काढून घेण्याची फॅशन आता आपल्याकडे चांगल्यापैकी रुळली आहे. मात्र, आजही आपल्याकडे टॅटू काढताना विशेष असा विचार केला जात नाही. एखाद्या सेलिब्रिटी किंवा मित्राने काढलेला टॅटू आवडला की, अगदी तसाच टॅटू आपल्याला हवा असतो. मात्र, टॅटू काढून घेताना त्यामागील संकल्पनेचा किंवा अर्थाचा विचार केल्यास आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे लक्षात येईल.
(बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने मध्यंतरी स्वत:च्या हातावार’डॅडीज लिटील गर्ल’
असा टॅटू काढून घेतला होता. त्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी अशाचप्रकारचे टॅटू आपल्या हातावर काढून घेतले होते.)
सेलिब्रिटी टॅटूज- तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीबद्दल आकर्षण वाटणे यात काहीच वावगे नाही. अनेकजण टॅटू काढून घेताना आवडत्या सेलिब्रिटीची स्टाईल कॉपी करताना दिसतात. मात्र, यामुळे तुम्ही स्वत:ची मुळ ओळख हरवून बसाल किंवा तुमच्यामध्ये स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करण्याची इच्छा नाही, असा एखाद्याचा समज होऊ शकतो. कारण, टॅटू म्हणजे तुमच्या व्यक्तीमत्वाला, विचारांना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारे माध्यम आहे. त्यामुळे तुमची आवड, तुमच्या व्यक्तीमत्वातील गुणांना साजेसा असा टॅटू काढणे केव्हाही चांगलेच.
महत्वाचा सल्ला: अशाप्रकारे टॅटू काढून घेताना एखाद्या टॅटू आर्टिस्टची मदत घ्या किंवा स्वत:च्या कल्पनाशक्तीवर जोर देऊन पहा. अन्यथा, एखाद्याला फॉलो करण्यातच तुम्ही सुख मानत असाल तर अशा लोकांची संख्या जगात कमी नाही इतके लक्षात ठेवा.
पारंपरिक विशेषणे अथवा संदेश-
अशाप्रकारच्या टॅटूजविषयी बोलायचे झाले तर, नक्की सुरूवात कुठून करावी हेच कळत नाही. अशाप्रकारचे टॅटूज निरर्थक प्रकारात मोडणारे असतात. म्हणजे स्वत:ला एखाद्या पारंपरिक प्रकारच्या विशेषणाने संबोधणे किंवा उगाच स्वत:ची आत्मप्रौढी मिरवण्यात काहीच अर्थ नसतो. माणसाने स्वत:वर प्रेम करणे गरजेचे असले तरी, या नादात तुम्ही आत्मकेंद्री तर नाही होणार ना , या गोष्टीचे भान राहू द्या. शेवटी प्रेम दुसऱ्यावर करा अथवा स्वत:वर, प्रेम हे आंधळचं असतं.
महत्वाचा सल्ला: आत्ममग्न किंवा स्वत:च्या कोषातून बाहेर पडून जीवनातील इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला शिका. नाहीतर, इतर कोणाच्या अंगावर तुमच्यासारखा हुबेहूब टॅटू बघून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता माना.
प्रिय व्यक्तीचे नाव अथवा प्रेमसंदेश
प्रिय व्यक्तीविषयीचे प्रेम व्यक्त करण्यासाठी तिचे अथवा त्याचे नाव थेट हातावर गोंदवून घेण्याची कल्पना कितीही रोमँटिक वाटत असली तरी, शक्यतो असे करणे टाळा. कारण भविष्यात तिच प्रिय व्यक्ती काही कारणाने तुमच्यापासून दूर गेल्यास टॅटूच्या रूपाने मनाला झालेल्या जखमांचे व्रण तुमच्या अंगावर राहू शकतात. याचे अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर, बॉलीवूड अभिनेता ह्रतिक रोशन आणि सुझान यांच्याकडे पाहता येईल. आयुष्य कधी वळण घेईल किंवा नाती कशी बदलून जातील याबद्दल ठामपणे असे काहीच सांगता येत नाही. तेव्हा मी तुझ्यावर सदैव प्रेम करत राहीन (I love you forever) असा टॅटू काढल्याने ती गोष्ट प्रत्यक्षात राहीलच, याची काही शाश्वती देता येत नाही. मात्र, तरीही तुम्हाला तुमच्या नात्याबद्दल ठाम विश्वास असेल तर अशाप्रकारचे टॅटू काढून घेण्यास हरकत नाही. परंतु, नशिबाचे फासे उलटे पडल्यास पश्चाताप करण्याशिवाय तुमच्या हाती काहीच उरणार नाही.
महत्वाचा सल्ला: अशाप्रकारचे टॅटू काढून घ्यायचे असल्यास, सुरूवातीला टेम्पररी टॅटूजचा पर्याय निवडावा. त्यापेक्षाही सोपा उपाय म्हणजे पेन किंवा मार्करने टॅटू काढावा.
स्वत:चे नाव– स्वत:च्या नावाचा टॅटू काढून घेण्याचा प्रकार बरेचदा आपल्याला पहायला मिळतो. मात्र, यामध्ये काही नावीन्य किंवा वेगळा विचार नसल्याने अशाप्रकारचे टॅटू विशेष लक्ष वेधून घेत नाहीत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 16, 2014 3:30 am