अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील संशोधन

अन्नपदार्थामध्ये ते टिकण्यासाठी मिसळल्या जाणाऱ्या रसायनांमुळे घातक परिणाम होत असावेत असा आपला नेहमीच समज असतो, किंबहुना तसे संशोधनही आहे, पण आता या पदार्थाचा सकारात्मक परिणामही सामोरा आला आहे. दुग्धजन्य पदार्थामध्ये ते टिकण्यासाठी वापरली जाणारी रसायने कर्करोगाच्या पेशींना मारतात असे नव्या अभ्यासात दिसून आले आहे. याच्याशिवाय प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जिवाणू संसर्गावरही ही रसायने प्रभावी ठरतात. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी निसिन मिल्कशेक उंदरांना दिले असता त्यांच्या मानेतील व डोक्यातील कर्करोगाच्या ७०-८० टक्के पेशी मारल्या गेल्या व गाठींचा आकार कमी झाला. हा परिणाम नऊ आठवडय़ांत दिसून आला व त्यामुळे या उंदरांचे आयुष्य वाढले.

वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार निसीनचा वापर कर्करोगाच्या पेशी मारण्याबरोबरच तोंडाच्या जिवाणूजन्य रोगातही होतो. संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षांनुसार निसीनमुळे सकारात्मक परिणाम दिसतात, निसीनचा वापर हा अतिशुद्ध अशा निसीन झेडपी या स्वरूपात केला तर त्याचा परिणाम चांगला दिसून येतो. शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे ८०० मिलिग्रॅम निसीन वापरल्यास हा परिणाम दिसून आला आहे. निसीन हा रंगहीन, चवहीन पावडरीसारखा पदार्थ असून तो खाद्यपदार्थात किलोमागे ०.२५ ते ३७.५ मि.ग्रॅ/कि.ग्रॅ इतक्या प्रमाणात वापरला जातो. अनेक अन्नपदार्थात निसीन वापरले जाते पण ते किलोमागे ८०० मिलिग्रॅम इतक्या प्रमाणात वापरलेले नसते.  कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी  किलोमागे ८०० मिलिग्रॅम निसीन आवश्यक असते. अनेक उत्पादनांमध्ये निसीन क्रीम असते शिवाय औषधांमध्येही त्याचा वापर असतो, दुधाळ गायींमध्ये त्याचा आरोग्यकारक म्हणून उपयोग केला जातो. निसीनमुळे मेथिसिलीन प्रतिकारक स्टॅफायलोकॉकस ऑरिअस म्हणजेच एमआरएसए या जिवाणूला आळा घालता येतो. मिशिगन विद्यापीठाच्या दंतवैद्यक शाखेच्या युवोनी कपिला यांनी सांगितले की, मानवी व प्राण्यांच्या शरीरातील एकही जिवाणू असा नाही जो निसीनपुढे टिकाव धरू शकेल.

निसीन हे जिवाणूंना घातक असते कारण ते त्यांच्या स्थिर भागात जाऊन चिकटते तसेच जिवाणूत प्रतिजैविकविरोधी बदल होण्यापूर्वीच त्याला मारले जाते. निसीनमुळे जैवपटले (बायोफिल्म्स) म्हणजेच जिवाणूंच्या वसाहती नष्ट करता येतात, जिवाणूंची ही पटले प्रतिजैविकांना विरोध करीत असतात. जर्नल ऑफ अँटिमायक्रोबियस केमोथेरपी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.