25 April 2019

News Flash

आता कार्डशिवायही एटीएममधून काढता येणार कॅश

ही सुविधा प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची मंजुरी मिळणे गरजेचे आहे. एनपीसीआय ही एटीएम नेटवर्कला नियंत्रण करण्यासाठी जबाबदार असते.

नोटाबंदीनंतर एटीएम आणि डेबिट, क्रेडीट कार्डचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली. सध्या तर अनेक जण कार्डव्दारेच पेमेंट करण्याला प्राधान्य देतात. तसेच बँकेतून पैसे काढणेही आता मागे पडले. त्यामुळे गरज लागली की एटीएममधून पैसे काढण्याचा ट्रेंड वाढल्याचे दिसते. यासाठी आपल्याजवळ एटीएम कार्ड असणे आवश्यक असते. पण आता त्याचीही आवश्यकता राहणार नाही. कारण एटीएममधून पैसे काढण्यासाठी एक खास अॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. त्याचा वापर करुन तुम्ही बॅंक खात्यामधून पैसे काढू शकता. विशेष म्हणजे अशाप्रकारे अॅपचा वापर करुन पैसे काढण्यासाठी स्मार्टफोनचा कॅमेरा उपयोगी पडणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) अॅनेबल्ड अॅपचा उपयोग केला जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या साह्याने दिवसेंदिवस जगणे जास्त सुसह्य होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

आपण एटीएममधून पैसे काढतो तेव्हा आपले कार्ड एका चीपच्या माध्यमातून स्कॅन केले जाते. पण आता कार्डशिवायही पैसे काढता येणार आहेत. स्क्रीनवर येणारा क्यूआरकोड तुम्ही या अॅपमध्ये स्कॅन केल्यास तुम्हाला पैसे मिळू शकणार आहेत. त्यामुळे कार्डाशिवायही तुम्हाला पैसे काढणे शक्य होणार आहे. यामध्ये सुरक्षा अतिशय महत्त्वाची असून त्याबाबतच्या चाचण्या सुरु असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे. ही सुविधा प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची मंजुरी मिळणे गरजेचे आहे. एनपीसीआय ही एटीएम नेटवर्कला नियंत्रण करण्यासाठी जबाबदार असते.

सध्या एजीएस ही कंपनी बँकांना एटीएमची सुविधा देते. अॅप्लिकेशनव्दारे पैसे काढणे ग्राहकांसाठीही सोपे होणार आहे. याबाबत एजीएस टेक्‍नोलॉजी ग्रुपचे चीफ महेश पटेल म्हणाले, या नव्या तंत्रज्ञानासाठी बॅंकेला आपल्या हार्डवेअरमध्ये बदल करण्याची गरज नाही. मात्र सॉफ्टवेअरमध्ये काही बदल निश्चित करावे लागतील. काही बँकेत कार्डलेस एटीएम विड्रॉवल सुविधा मिळते. परंतु ही सुविधा त्यापेक्षा अधिक सोपी आणि जलद असेल असेही पटेल यांनी स्पष्ट केले.

First Published on December 6, 2018 2:55 pm

Web Title: get cash from atms using upi app no need of card now