गुगल म्हणजे कोणतीही गोष्ट अडली की ज्याच्याकडे हक्कानी उत्तर मागता येते अशी जागा. हल्ली एखादा रस्ता शोधण्यापासून ते पासपोर्ट काढून दुसऱ्या देशात रहायला जाण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींची उत्तरे गुगलला सहज देता येतात. या मायाजालाने आपले आयुष्य सोपे केले आहे असे म्हणता येईल. मात्र असे असताना गुगलला ‘जीझस’ या शब्दाचा अर्थ माहित नसल्याचे नुकतेच समोर आले आहे. काही युजर्सनी याबाबत तक्रार केली आहे. आपण ‘हू इज जीझस’  असे गुगलवर टाकल्यावर गुगलला त्याचे उत्तर देता आले नाही. पण दुसरीकडे बुद्ध, मोहम्मद यांबाबत मात्र गुगलकडे पुरेशी माहिती उपलब्ध होती असे या तक्रारदाराने म्हटले आहे. त्यामुळे गुगलवर जीझसला सेन्सॉर करण्यात आल्याचेही या तक्रारदाराचे म्हणणे आहे. विशिष्ट धर्माशी निगडित शब्द असल्याने त्या धर्माचे लोक गुगलवर भलतेच चिडले आहेत.

याबाबत गुगलचे अधिकारी डॅनी सुलिवन यांनी ट्विटरव्दारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात, अशाप्रकारे गुगलवर जीझसबाबत माहिती येत नाही म्हणजे आम्हाला जिजसचा अनादर करायचा आहे असे नाही. तर काही प्रतिक्रिया तर अशा आहेत की ज्यामुळे अफवा पसरू शकतील तसेच त्या विध्वंस करण्यास प्रेरीत करू शकतील. त्यामुळे गुगल या प्रकरणातील सर्व माहिती घेत असून या शब्दाच्या अर्थाबाबतचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.