भारतीय प्रादेशिक भाषांच्या माध्यमातून जास्तीत जास्त भारतीय लोकापर्यंत पोहचण्यासाठी गुगलने प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या काही काळातच गुगलची प्रादेशिक भाषेमध्ये व्हॉइस सर्च सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही मराठीत बोलला तरी देखील तुमच्या प्रश्नाची उत्तरे गुगलद्वारे मिळण्याची शक्यता आहे. ३५ कोटी इंटरनेट वापरणाऱ्या लोकांपैकी १५ कोटी लोक हे प्रादेशिक भाषांमध्ये इंटरनेट वापरतात. २०२० पर्यंत भारतामध्ये इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ६५ कोटी होणार आहे. इंडिक किबोर्ड आणि ऑटोकम्पलिटद्वारे ग्राहकांना जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने हव्या त्या गोष्टी शोधण्याची सुविधा प्राप्त होईल असे गुगल सर्चचे शशीधर ठाकूर यांनी म्हटले आहे.
गेल्या दीड वर्षांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये सर्च करण्याचे प्रमाण १० पटीने वाढल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. व्हॉइस सर्चमुळे अशिक्षित लोकांना देखील सर्च इंजिनचा वापर करता येऊ शकणार आहे. इंडिक किबोर्ड सध्या ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे. ऑटो कम्पलिट या फीचरद्वारे तुम्हाला त्वरित हव्या त्या गोष्टी बोटांवरच उपलब्ध होतील असे ठाकूर यांनी म्हटले. कमी डेटामध्ये जास्त गोष्टी कशा शोधता येतील याकडे सध्या आमचा कल आहे असे ठाकूर यांनी म्हटले. जर तीन सेकंदापेक्षा जास्त वेळ लोड होण्यास लागत असेल तर ४० टक्के ग्राहक ती वेबसाइट त्वरित सोडून देतात. असे एका पाहिणीद्वारे समोर आले आहे.
ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही मोबाइलवरील सर्च पेजेस हे वेगवान करण्याचा प्रयत्न करत आहोत असे ठाकूर यांनी म्हटले. बरोबरच, १० पट डेटा कमी खर्च कसा होईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत असे ते म्हणाले. हिंदी भाषेबरोबरच स्थानिक माहिती उपलब्ध करुन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत असे ते म्हणाले. आर्टिफिशिएल इंटिलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने तंत्रज्ञानात मोठे बदल घडविण्यात येतील असे ते म्हणाले. मशीन लर्निंगच्या सहाय्याने अनुवादाचे काम होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही खूप प्रगती केली आहे. सध्या इंटरनेटवर असलेल्या वेबसाइट पैकी ०.१ टक्के वेबसाइट या स्थानिक भाषेमध्ये आहेत. त्यामुळे भविष्यकाळात स्थानिक भाषेतील वेबसाइटला प्रोत्साहन देण्याचे काम गुगलतर्फे करण्यात येईल. असे ठाकूर यांनी म्हटले आहे. स्थानिक भाषेचा वापर केल्यास तंत्रज्ञान हाताळणे ग्राहकांना सोपे जाते असा आमचा अनुभव आहे असे ठाकूर म्हणाले.