केस विंचरायला उपयोगात येणारा कंगवा आता आपल्या केसांचे आरोग्यपण सांगणार आहे. ‘वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनजमेंट’मध्ये नुकत्याच पार पडलेल्या ‘डिझाईन इनोव्हेशन वर्कशॉप’मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ही करामत केली आहे.
केस िवचरण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कंगवा वापरला तर तुम्हाला तुमच्या केसांचे आरोग्य कळणार आहे. या कंगव्याला एक कॅमेरा लावण्यात आला आहे. हा कॅमेरा केसांच्या मुळाचे छायाचित्र टिपतो. हे छायाचित्र एका विशिष्ट सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केले की तुम्हाला केसांच्या आरोग्याची बित्तंबातमी मिळू शकते. या कंगव्याचे छोटे रूप या कार्यशाळेत साकारण्यात आले होते.
अमेरिकेतील ‘एमआयटी मीडिया लॅब’ने ही कार्यशाळा आयोजित केली होती. यामध्ये ३८० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी मिळून विविध प्रकारची १०० उपकरणे तयार केली आहेत. यातील काही निवडक उपकरणांवर आणखी काम करून ती विकसित केली जाणार आहेत. एमआयटी मीडिया लॅबमधील भारतीय विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही संकल्पना सुरू केली आहे. देशात संशोधनाला वाव मिळावा आणि जागतिक पातळीवरील तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने हा उपक्रम खूप मोलाचा आहे. या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्या संकल्पना मांडायच्या, त्यानंतर तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांनी मिळून त्या संकल्पनांच्या आधारे उपकरणांची छोटी रूपे तयार केली आहेत.
कार्यशाळेतील आणखी काही प्रयोग
*ऑटोमेटेड स्टोव्ह – केरोसीनची बचत करण्यासाठी या स्टोव्हची निर्मिती करण्यात आली आहे. एखादा पदार्थ शिजवण्यासाठी टायमर सेट केल्यावर त्या वेळी स्टोव्ह आपोआप बंद होतो. केरोसिनची तर बचत होतेच शिवाय याची किंमतही खूप कमी आहे.
*बूम बॉल – कमी ऐकू येणाऱ्यांना संगीताची मजा घेता यावी या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये संगीताचे रूपांतर हादऱ्यांमध्ये होते. यामुळे त्याला संगीताची मज्जा घेता येऊ शकते.
*फास्ट – एटीएममधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहेच. यावर तोडगा म्हणून हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. या पर्यायमध्ये एटीएम पिन ऐवजी आपला चेहरा आणि बोटाचे ठसे ही आपली ओळख असणार आहे. यामुळे एटीएम चोरीला गेले तरी त्याचा गरवापर कुणाला करता येणार नाही.