News Flash

औषधी आले, सुंठ; जाणून घ्या काय आहेत फायदे

आले रुची उत्पन्न करते, फाजील चरबी वाढू देत नाही

प्रत्येक गृहिणीला आले सुपरिचित असते. अाल्यामुळे पदार्थांना छान स्वाद येतो आणि तो अधिक रुचकर बनतो. रोजचा सकाळचा चहादेखील आल्यामुळे लज्जतदार बनतो. आले पदार्थांची रुची वाढविणारे तर असतेच पण त्या व्यतिरिक्त औषध म्हणूनही उत्तम कार्य करते. जिभेच्या टोकापासून ते गुदापर्यंत अन्न वाहून नेणाऱ्या महास्रोतसांत दीपन, पाचन व अनुलोमन अशी तीनही कामे आले किंवा सुंठ करते. ही कामे करताना आतडय़ाची यत्किंचित हानी होत नाही. उलट आतडय़ांना नवा जोम प्राप्त होतो. आले, सुंठ चवीने उष्ण असूनही शरीराचे वजन किंवा बल घटवत नाही. आले रुची उत्पन्न करते, फाजील चरबी वाढू देत नाही. त्याचबरोबर शरीर फार रूक्षही होऊ देत नाही.

आल्याचा तुकडा किंवा सुंठचूर्ण जिभेचा चिकटा दूर करते, उलटीची भावना थांबवते. आमाशयात आमपचनाचे काम करते. लहान आतडय़ात पित्त वाढू देत नाही. मोठय़ा आतडय़ात मळ सुटा करते. त्यामुळे मळ चिकटून राहात नाही. सर्व आतडय़ांतील वायूचे अनुलोमन व खाल्लेले अन्न ठरावीक वेळात पुढे नेणे, त्यावर पचनाचे संस्कार करणे हे काम आले एकटे करू शकते म्हणून जेवणात सर्व पदार्थात आले हवे. सुंठ आल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण आहे.

संधिवात, आमवातातील वेदना आल्याचा रस किंवा सुंठेचे चूर्ण घेतल्यास लगेच थांबतात. उलटी, वारंवार संडासची भावना, अजीर्ण, पोटफुगी, करपट ढेकरा, आम्लपित्त, पोटदुखी या तक्रारींत आल्याचा तुकडा, रस किंवा सुंठचूर्ण काम करते. आले, लिंबाचे पाचक प्रसिद्ध आहे. प्रत्येक घरात असे हुकमी औषध ‘इमर्जन्सी’ तातडीचे औषध म्हणून हवेच. जुनाट सर्दी, दमा, कफ, खोकला या विकारांत न कंटाळता आले तुकडा चघळावा, रस प्यावा. सुंठ कधीही उकळू नये.

आले हृदयाला हितकारक आहे. पोटात चरबी साठू देत नाही. अर्धशिशी विकारात सुंठ व गूळ उपयुक्त आहे. तसेच आल्याचा रस दोनच थेंब नाकात टाकावा. तीव्र पोटदुखीत आल्याचा रस बेंबीत जिरवावा. आमवातातील तीव्र वेदनांत सांध्यांना आल्याचा रस चोळावा. थंडी, ताप, न्यूमोनिया, कफविकार यात पाठीला व छातीला आलेस्वरस चोळावा. पोटात घ्यावा. आल्याच्या जोडीला पुदिना, तुळस, विडय़ाची पाने वापरावीत. ताज्या आल्याच्या अभावी ताज्या सुंठीचे चूर्ण वापरावे.

थोडक्यात आल्याचे फायदे जाणून घ्या –

  • चांगली भूक लागण्यासाठी, कोणत्याही विकारामुळे गेलेली तोंडाची चव येण्यासाठी आल्याच्या तुकडय़ाला साधे किंवा सैंधव मीठ लावून जेवणापूर्वी चावून खावे.
  • खोकल्याची सतत ढास लागत असेल किंवा दम लागला असेल तर एक चमचा आल्याचा रस+एक चमचा मध घालून सावकाश चाटण करावे आणि गरम पाणी प्यावे.
  • पोटदुखी, अपचन, अजीर्ण, ओकारी, मळमळ, पोट डब्ब होणे या सर्व तक्रारींसाठी आले रस+लिंबूरस+सैंधव मीठ यांपासून बनविलेले ‘पाचक’ २/२ चमचे तीन वेळा गरम पाण्याबरोबर घ्यावे. जेवणात आले+पुदिना+कोथिंबीर+हिंग+जिरे+सैंधव अशी चाचणी करून खावी.
  • सर्दी-सायनस असो किंवा पित्ताने डोकेदुखी असो, आले ठेचून त्याचा चोथा कपाळावर घासावा किंवा आल्याचा रस टाळूवर चोळावा. थोडी आग होते, पण लगेच डोके उतरते.
  • थंड प्रदेशात फिरताना अंग थरथरते, दातखीळ बसते, अंग गार पडते यासाठी लगेच आल्याचा तुकडा चावून खायला द्यावा आणि आल्याचा रस कपाळ, मान, छाती, हात-पायाचे तळवे यांना चोळावा.
  • दुखऱ्या सांध्यांना आल्याच्या रसात मोहरी वाटून लेप द्यावा किंवा एरंडेल+आले रस एकत्र करून चोळावे किंवा आले व लसून वाटून त्याचा लेप द्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 11:54 am

Web Title: health benefit of ginger nck 90
Next Stories
1 Xiaomi आज लाँच करणार दोन लॅपटॉप, ‘इथे’ बघा लाइव्ह इव्हेंट
2 ‘गुगल’ने ‘वनप्लस’ला दिला दणका…विकले ‘इतके’ लाख फोन
3 खोकला, अन्नपचन, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे अन् बरचं काही…; जाणून घ्या कोथिंबीरीचे १२ फायदे
Just Now!
X