उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचा रक्तदाब खूप कमी झाल्यास त्याचा हृदयाच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होतो, असे अमेरिकी संशोधकांनी केलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थमधील शास्त्रज्ञांनी १९८७ पासून या विषयावर सलग २१ वर्षे संशोधन केले. त्यात त्यांनी धमनीकाठीण्याचा धोका असलेल्या ११,५६५ नागरिकांचा अभ्यास केला. त्यांच्या वेळोवेळी विविध वैद्यकीय चाचण्या घेतल्या. त्यातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. अशा अखेरच्या चाचण्या २०१३ साली घेण्यात आल्या. अभ्यासात सहभागी नागरिकांचे सरासरी वय ५७ वर्षे होते. त्यापैकी ५७ टक्के महिला आणि २५ टक्के कृष्णवर्णीय होते.

या संशोधकांच्या असे लक्षात आले की रुग्णांच्या सिस्टॉलिक (रक्तदाबाची १२०-८० पैकी वरची पातळी) रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली तर त्यांचा डाएस्टॉलिक (रक्तदाबाची १२०-८० पैकी खालची पातळी) रक्तदाबही खूप कमी होण्याचा धोका संभवतो. तसे झाल्यास हृदयाच्या स्नांयूंचे नुकसान होऊ शकते. यापूर्वीच्या अभ्यासांच्या निकषांनुसार डॉक्टरांचा सिस्टॉलिक रक्तदाब नियंत्रणात आणण्यावर प्रामुख्याने भर असे. मात्र आता त्यातील धोके लक्षात येऊ लागले आहेत.  शास्त्रज्ञांनी शरीरातील ट्रोपोनीन या प्रथिनाचा विशेष अभ्यास केला. हे प्रथिन स्नायूंच्या आकुंचनाशी संबंधित असून हृदयविकाराचा झटका किंवा रक्तवाहिनीत गुठळी झाल्याने हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते तेव्हा या प्रथिनाच्या प्रमाणात वाढ झालेली आढळते. रक्तातील ट्रोपोनीनचे प्रमाण दर लिटरमागे १४ नॅनोग्रॅम किंवा त्याहून अधिक असल्यास ते हृदयाला नुकसान झाल्याचे द्योतक असते. डाएस्टॉलिक रक्तदाब फार कमी असल्यास हृदयाला थेट नुकसान पोहोचते असे या अभ्यासात ठामपणे सिद्ध झाले नाही. मात्र रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये डाएस्टॉलिक रक्तदाब फार कमी असल्यास त्यामुळे हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होऊ शकते असे सांख्यिकी माहितीवरून सिद्ध झाले. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)