चर्चा
यंदा जागतिक आरोग्य संघटनेच्या कॅलेंडरमध्ये झळकण्याचा मान मिळालेली बाइक चालवणारी गीता वर्मा आणि शोभायात्रेत बाइकवर मिरवणाऱ्या स्त्रिया यांच्यामधला मुलभूत फरक आपण समजून घ्यायला हवा.

सार्वजनिक आरोग्य क्षेत्राची विद्यार्थिनी असताना महाराष्ट्रातल्या निवडक जिल्ह्य़ांतील आरोग्य केंद्रांची ओझरती भेट घडत असे. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या महिनोन्महिने प्रतीक्षेत असलेली प्राथमिक आरोग्य केंद्रे, एका साध्या तापाच्या गोळीसाठी तीन तीन मैल पायी प्रवास करणारे रुग्ण, मुलाच्या अपंगत्वाच्या दाखल्यासाठी जिल्ह्य़ा रुग्णालयाला खेटे घालणारे पालक हे सर्व बघून माझा हळूहळू देवावर विश्वास बसू लागला. आरोग्य यंत्रणा चहूबाजूंनी पोरकी झालेली असूनही मुले जन्माला येत आहेत, ती जगत आहेत, कशी का होईना पण मोठी होत आहेत याचे स्पष्टीकरण दैवी शक्तीच देऊ  शकेल अशी माझी धारणा झाली. कालांतराने प्रत्यक्ष काम करायला लागल्यावर हीच आरोग्य व्यवस्था अत्यंत जवळून बघायला मिळाली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय, वाहतुकीच्या साधनांशिवाय, आर्थिक मदतीशिवाय अत्यंत कार्यक्षमतेने काम करणारी एक अदृश्य कष्टकरी मुंग्यांची भलीमोठी फळी दृष्टीस येऊ  लागली. या मुंग्या म्हणजे एकटय़ा महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने असलेल्या आणि प्राथमिक आरोग्य सेवेचा जवळजवळ सर्व भार एकहाती वाहून नेणाऱ्या आशा, नर्स मिडवाइफ (एएनएम) सारख्या आरोग्यसेविका (कम्युनिटी हेल्थ वर्कर्स).

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?

आरोग्य व्यवस्थेच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर विविध प्रकारची कामे करणाऱ्या आरोग्यसेविकांचे जाळे भारतभर पसरले आहे. यांची संख्या १० ते १२ लाखांच्या घरात असेल. ग्रामीण भागात ३० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असणे अपेक्षित असते आणि एका केंद्राअंतर्गत साधारण चार ते पाच एएनएम असतात. याशिवाय प्रत्येक गावात एक हजार लोकसंख्येमागे एका आशाची नेमणूक केलेली असते. गावपातळीवरील लसीकरण, मलेरिया, हगवण, न्यूमोनिया अशा आजारांवरील प्राथमिक उपचार, गर्भवती आणि नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी, वस्तीपातळीवरील अंगणवाडय़ांना सकस आहाराचा पुरवठा तसेच क्षयरोग, कुष्ठरोग, पोलिओ निवारण कार्यक्रमाची अंमलबजावणी अशी महत्त्वाची कामे या सेविका करतात. शासनपुरस्कृत प्रत्येक कल्याणकारी योजनेच्या अंमलबजावणीत या आरोग्यसेवकांचा मोठा वाटा असतो.

पण या सर्व कामाचा सन्मान म्हणून त्यांच्या नशिबी काय येते? वर्षांनुवर्षे रखडलेले मानधन (पगार नाही!), काम करण्यास आवश्यक असलेल्या साधनसामग्रीचा अपुरा साठा, प्रसंगी स्वत:च्या खिशाला तोशीस लावून पार पाडावी लागणारी जबाबदारी, सरकारदरबारी पगारदार म्हणून गणती व्हावी म्हणून करावी लागणारी नित्याची आंदोलने आणि यातील काहीच पदरी पडले नाही तर गमवावा लागणारा जीव!

या सगळ्याची आज चर्चा करण्याचे कारण म्हणजे हिमाचल प्रदेशमधल्या मंडी जिल्ह्य़ातील गीता वर्मा या आरोग्यसेविकेला जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कॅलेंडरमध्ये झळकण्याचा मान मिळाला आहे. गीताने हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात कधी पायी तर कधी बाइकवर फिरून ‘गोवर’ आणि ‘रुबेला’ या दोन आजारांवरील लसीकरण १०० टक्के गावांमध्ये पूर्ण केले. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने तिच्या कामाला दिलेली ही सलामी. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा गावपातळीवरील आरोग्य व्यवस्थेचा अनुभव असणाऱ्या वाचकांना गीताच्या सन्मानाचे महत्त्व कळेल.

एखाद्या व्यक्तीला नेमून दिलेले काम सचोटीने करण्यासाठी प्रोत्साहित करणारे घटक कोणते असू शकतात? पगार, पद, सन्मान, यातून दुणावणारा आत्मसन्मान, पदोन्नतीची आशा, आपल्या पुढील पिढीचे बरे चालेल याची किमान हमी किंवा खरं तर यापैकी काहीच नाही. आरोग्य सेविकांच्या बाबतीत ‘काहीच नाही’ हा घटकच मोठा आहे. नाही म्हणायला त्यांना गावात थोडाफार मान मिळतो, पण त्यांना कराव्या लागणाऱ्या कष्टाच्या तुलनेत तो नगण्यच!

आपल्या एका संपूर्ण देशात अनेक लहान लहान देश आहेत. त्यामुळे पावलोपावली भाषा बदलते, जातीय आणि धार्मिक अस्मिता सतत मी म्हणत असतात आणि आरोग्य सेवेला सरकारदरबारीत दुय्यम स्थान असतं, अशा परिस्थितीत या आरोग्य सेविका तुटपुंज्या साधनसामग्रीने पण अत्यंत कुशलतेने बाळंतपणं करतात, बाळांची वजनं घेतात, कुपोषित बाळं जगवतात, लसीकरण मोहिमा राबवतात, अंगणवाडय़ा चालवतात, मध्यान्ह भोजनाचा गाडा रेटतात, हगवणीचे रुग्ण बरे करतात, मलेरियाचे निदान करतात, अपंग बाळांची छाननी करतात. थोडक्यात, शासनाद्वारे जाहीर झालेला प्रत्येक रोग-निवारण कार्यक्रम आणि प्रत्येक आरोग्य अभियान प्रत्यक्षात आणण्याचे काम त्या करतात.

आरोग्य सेविकांना नेमून दिलेल्या कामांपैकी लसीकरण हे अनेकार्थी जोखमीचे काम. या लसी विशिष्ट तापमानात ठेवल्या नाहीत तर निरुपयोगी ठरतात, त्यामुळे आरोग्य केंद्राच्या बाहेर त्या बर्फाच्या पेटीत वाहून नेताना खूप काळजी घ्यावी लागते. हिमाचल प्रदेशसारख्या राज्यात बाहेर बर्फ  भुरभुरत असताना लोकांना एकत्र करून लसीकरण मोहीम राबवणे अधिकच कठीण. बाळंतपणं करणाऱ्या दाईला किंवा तापाची गोळी देणाऱ्या डॉक्टरला लोक तोंडभरून आशीर्वाद देतात पण ते भाग्य लसीकरण करणाऱ्या एएनएसच्या नशिबी येईलच असे नाही. याचे कारण लसीकरणाभोवती गुंफलेल्या अनेक गैरसमजुती. मुस्लीम समाजात विशेष करून पोलिओ लसीकरणाला मोठय़ा प्रमाणावर विरोध केला जातो. पोलिओचे ‘दो बुंद जीवन के’ हे बाळाला नपुंसक करतात अशी या समाजाची धारणा असल्यामुळे पोलिओ निर्मूलनाचे काम करणाऱ्या आरोग्य सेविकांना स्थानिकांचा बराच रोष पत्करून लसीकरण करावे लागते. मागील महिन्यात बलुचिस्तानमध्ये पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या दोन सेविकांवर गोळीबार करण्यात आला आणि त्यात त्यांना जीव गमवावा लागला. हे वानगीदाखल दिलेले एक उदाहरण. एरवी या सेविकांच्या समस्यांना अंतच नाही.

स्त्री ही कोणत्याही अस्थैर्याची पहिली बळी असते. या न्यायाने छोटय़ा गावांमध्ये सतत धगधगत असणाऱ्या जातीय विद्वेषाची झळ या सेविकांनाही बसते. परजातीय सेविकेला विशिष्ट वस्तीत घर दिले जात नाही. त्यामुळे लांबवर असलेल्या प्राथमिक केंद्रात पायी जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा वेळी तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा ठाकतो. आर्थिक प्रश्न आणखी निराळे. महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांनी ज्येष्ठता क्रमानुसार पगार, बढती मिळावी म्हणून केलेल्या आंदोलनाच्या आठवणी ताज्या आहेतच. आणि अनेक महिने पदरमोड करून मध्यान्ह आहार देणाऱ्या अंगणवाडी सेविकेने अखेर केलेली आत्महत्याही आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल. या सर्व पाश्र्वभूमीवर गीता वर्माला बाइक दामटत १०० टक्के गावांपर्यंत पोचायला काय कष्ट झाले असतील, याची कल्पना आपल्याला येईल.

पुढच्या महिन्यात जागतिक महिला दिन आहे. तो साजरा करण्याचा अलीकडच्या काळातला एक सोपा आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे भगवे फेटे बांधून, नऊवारी नेसून, काळे गॉगल आणि नथ घालून बाइकवर स्वार होऊन शोभायात्रा काढणे आणि त्याचे १० बाय १० फूटचे फ्लेक्स तयार करून रस्त्यांवर लावणे. (महिला दिनाचा हा तथाकथित प्रकार पुण्यात प्रचलित आहे. ) आपण स्त्री आहोत आणि आपल्याला बाइक चालवता येते हेच आपले कर्तृत्व असे मानून या दोन गोष्टींचा अभिमान वाटून घेण्याचा ८ मार्च हा हक्काचा दिवस! तो स्त्री शक्तीचा जागर ठरतो म्हणे! गीता वर्माचा कॅलेंडरवरील बाइकवर लसींचा डबा सावरत बसलेला फोटो पाहून मला या ८ मार्चच्या बाइकधारी महिला आठवल्या. ८ मार्च हा दिवस खरं तर गीता आणि तिच्यासारख्या लाखो आरोग्य सेविकांनी साजरा करण्याचा दिवस. जिवावर उदार होऊन दुर्गम भागात एकटय़ाने आपली जबाबदारी निभावण्याला कर्तृत्व लागते, शहरांच्या गर्दीत रॉयल एनफिल्डचा धुराळा उडवण्याला नाही. दैनंदिन आयुष्यात प्रतीकांना महत्त्व असते हे खरे मानले तरी अंतिमत: ती प्रतीकेच आहेत हे विसरता कामा नये. गीता वर्माच्या निमित्ताने आपल्याला सहसा स्मरण न होणाऱ्या या कामकरी फळीचे मोल समजावून घ्यायला हवे. आपली मुले कदाचित अंगणवाडय़ांमध्ये जात नसतील पण भारतातील जवळजवळ १७ कोटी जनतेचे आरोग्य हे या आरोग्य सेविकांच्या हाती आहे. जनगणमन म्हणताना आपल्याला सीमेवरील सैनिक आठवतात तसेच या सेविकाही आठवायला हरकत नाही. दरवर्षी सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार दिला जातो त्याप्रमाणे या सेविकांचाही यथोचित सन्मान व्हायला हवा. आणि याही प्रतीकांच्या पलीकडे जायचे असेल तर काय करायला हवे हे खरे तर सरकारला माहीत आहेच. पण लक्षात कोण घेते?
चारुता गोखले – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा