18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

चेहऱ्याचे सौंदर्य खुलवायचेय? हे आहेत उपाय

सोपे घरगुती उपाय

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 10, 2017 5:26 PM

श्रावण महिना आला की सणावारांना सुरुवात होते. गणपती, दसरा, दिवाळी असे सण अगदी एकामागोमाग एक येतात. या काळात नटूनथटून मिरवणे हे मुलींसाठी फार खास असते. यासाठी मुली बऱ्याच आधीपासून तयारीलाही लागलेल्या दिसतात. कपड्यांची खरेदी, मॅचिंग दागिने, पार्लर, मेकअप यांसारख्या गोष्टी सुरु होतात आणि सणावाराचे वातावरण असल्याचे जाणवायला लागते. चेहऱ्याची त्वचा तुमचे सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलवते. नुकताच दसरा झाला आणि आता दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. आता या काळात आपल्याला मेकअप करायचा असल्यास कोणती काळजी घ्यावी याविषयी…

१. कोरडी हळद लिंबाच्या रसात भिजवावी. हा पॅक चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यास मदत होते.

२. तुमची त्वचा खूप कोरडी असेल आणि त्यावर मेकअप चांगल्या पद्धतीने बसत नसेल तसेच चेहऱ्यावर काळे डाग असतील तर चंदन पावडर दूधात मिसळून त्याचा लेप चेहऱ्याला लावावा. हा लेप वाळल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.

३. टोमॅटोच्या रसामध्ये लिंबाचा रस एकत्रित करुन ते चेहऱ्याला लावावे. यामुळेही चेहऱ्यावरचे डाग जाण्यास मदत होते.

४. त्वचा चमकदार करायची असल्यास मध असलेला फेसपॅक वापरावा. त्याचा खूप चांगला उपयोग होतो.

५. ओटसची पावडर आणि दूध एकत्र करुन ते चेहऱ्याला लावल्यास त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

६. आहारात फळांचा समावेश करण्याबरोबरच सिझनल फळांचे पॅकही चेहऱ्याला लावावेत. यांमध्येही संत्री, स्ट्रॉबेरी नियमित लावल्यास त्याचा फायदा होतो.

७. चेहऱ्याची त्वचा तुकतुकीत दिसण्यासाठी आहारात व्हीटॅमिन सी असणे अतिशय आवश्यक असते. त्यामुळे लिंबू आणि इतर आंबट पदार्थांचा आहारात समावेश ठेवावा

८. जास्त काळ चेहऱ्यावर मेकअप ठेवल्यास त्याचाही चेहऱ्याच्या त्वचेवर वाईट परिणाम दिसून येऊ शकतो. त्यामुळे विशिष्ट कार्यक्रम झाल्यावर मेकअप न विसरता काढून टाकावा.

(ही बातमी वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

First Published on October 10, 2017 5:26 pm

Web Title: how to get glow on your face by simple home remedies