उन्हाळी सुट्ट्या सुरु असताना बाहेरील तीव्र उन्हात फिरण्यापेक्षा मुले घरात राहून इंटरनेटवरच अधिकाधिक वेळ व्यतीत करणे पसंत करु लागली आहेत. एकीकडे साबयर विश्वाच्या माध्यमातून मुलांना अनेक सकारात्मक आणि नाविण्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळत आहेत. परंतु प्रामुख्याने लहान मुलांना ऑनलाईन जगतापासून अनेक प्रकारचे धोकेही संभवत आहेत. मायक्रोसॉफ्टने अलिकडेच तयार केलेल्या डिजीटल सौजन्य निर्देशांकानुसार, प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना अनेक प्रकारच्या ऑनलाईन धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. हा अहवाल असेही सांगतो की मुलांच्या डिजीटल सुरक्षेवर त्यांच्या पालकांचाच सर्वाधिक प्रभाव असतो. बहुतेक मुले त्यांच्या सुरक्षित ऑनलाईन वावराबाबत त्यांच्या पालकांवरच अवलंबून राहत असतात.

वरिष्ठ मनोचिकित्सक डॉ. ज्योती कपूर मदन यांच्या मते, मुले सायबर विश्वात वावरत असताना त्यांच्या आसपासच्या ऑनलाईन वातावरणाबाबत पालकांनीच सावध राहण्याची गरज आहे. ऑनलाईन पध्दतीने केल्या जाणार्‍या छळानंतर मुलांच्या वर्तनात होणार्‍या बदलांबाबत पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मुलांना कमालीच्या स्पर्धात्मक युगात अनुकूल बनण्यासाठी इंटरनेटच्या अद्भूत जगतात सोडत असताना त्यांची डिव्हायसेस उत्कृष्ट सुरक्षा फीचर्सनी सुसज्ज असल्याची खात्री करण्याचीही वेळ आता आली आहे. पाहूयात सुरक्षेच्यादृष्टीने काही महत्त्वपूर्ण टिप्स…

१. व्यसन लागणार नाही याची काळजी घ्या – मुलांच्या लहान वयातच त्यांच्याशी ऑनलाईन सुरक्षिततेबाबत चर्चा सुरु करा. मुले सर्वप्रथम डिजीटल विश्वात प्रवेश करतात, तेव्हापासूनच त्यांच्याशी ऑनलाईन सुरक्षेबाबत संभाषण सुरु केले पाहिजे. मुलांना इंटरनेटच्या वापराचे व्यसन लागणार नाही याबाबत पालकांनी विशेष दक्षता घ्यावी.

२. सर्व डिव्हायसेस वापरासाठी सुरक्षित असल्याची खात्री करा – तुमच्या मुलाला एखादे डिव्हाईस वापरण्यास देण्याआधी ते सर्व प्रकारे सुरक्षित आहे का याची पडताळणी करणे गरजेचे आहे. डिव्हाईसमध्ये ऑपरेटिंग सिस्टिमची नवीन आवृत्ती इन्स्टॉल करावी तसेच ती नियमितपणे अपडेटही करावी. व्हायरस प्रोटेक्शनच्या अपटेड्सचीही नियमितपणे तपासणी करा. सर्व डिव्हायसेसवर वेबसाईट्स आणि अ‍ॅप्ससाठी प्रायव्हसी सेटींग्ज सक्षम करणे आवश्यक आहे.

३. वेगळे पासवर्डस वापरा – पासवर्डस हे घरांच्या दरवाजांसारखे असतात. ते घरात प्रवेश करण्याची पहिली सिमा असल्यामुळे ते स्ट्राँग असणे आवश्यक आहेत. कॅपिटल आणि लोअरकेस अक्षरांच्या मिश्रणासह, क्रमांक, चिन्हे यांचा समावेश असणारी दीर्घ वाक्ये आदर्श पासवर्ड बनू शकतात. मात्र तो पासवर्ड फार किचकटही असू नये.

४. क्लिक करताना सावधगिरी बाळगा – इंटरनेटवर असंख्य व्हायरसेस आणि स्पायवेअर असल्यामुळे कोणत्याही ठिकाणी वेबसाईट्स, लिंक्स किंवा ईमेल्सवर क्लिक करताना खूप विचार करा. जरी तुम्ही संबंधीत व्यक्तीला ओळखत असाल तरीही.

५. वैयक्तिक माहिती शेअर करु नका – सोशल मिडिया वापरत असताना वैयक्तिरीत्या ओळखत नसणार्‍या अनोळखी लोकांना मित्र बनवू नका, याबाबत मुलांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मसवर प्रायव्हसी फिल्टर्स आणि सुरक्षा तपासण्यांच्याशिवाय वैयक्तिक माहिती शेअर केल्याने मुले अडचणीत येऊ शकतात. मुले ज्यावेळी भावनात्मक, निराश किंवा रागात असतील तेव्हा ते सोशल मीडियाचा वापर करणार नाहीत याची काळजी घ्या.

६. पालक नियंत्रणे वापरा – हे पालकांसाठी अतिशय महत्वाचे आहे. विंडोज १० डिव्हायसेससाठी पालक नियंत्रणे वापरल्यामुळे पालक तसेच मुलांसाठीही एक चांगले वातावरण निर्माण होते. त्यामुळे मुलांचा ऑनलाईन वावर सुरक्षीत बनतो. गुड स्क्रीन टाईम सवईमुळे पालक मुलांची इंटरनेटवरील ब्राउजींगची वेळ सेट करुन नियंत्रीत करु शकतात. अ‍ॅक्टीविटी ट्रॅकींगसारख्या फीचरमुळे मुलांच्या डिव्हाईसचे स्थान ट्रॅक करुन मुलांचा एकंदरीत डिजीटल वावरच ट्रक करणे शक्य बनते. याशिवाय इतर अनेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

एकदा पालक नियंत्रणे सेट केल्यानंतर तुम्ही मुलांच्या सर्व ऑनलाईन क्रियांचा सविस्तर अहवाल पाहू शकता. मुले कोणती अ‍ॅप्लिकेशन वापरु शकतील, कोणत्या वेबसाईट्सना भेट देऊ शकतील, ते संगणक किंवा विंडोज आधारीत उपकरणांचा वापर किती वेळ करु शकतील? या सगळ्य़ाबाबत पालक आपले नियंत्रण सेट करु शकतात. नवीन तंत्रज्ञानाच्या अमर्याद कक्षांचा लाभ घेत असतानाच तो अनुभव अधिक सुखकर आणि सुरक्षित बनवण्यासाठी आपण उपलब्ध होणार्‍या सर्व सुरक्षा फीचर्सचा वापर प्रभावीपणे केला पाहिजे.