व्हॉटसअॅप हे सध्या आपल्या अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. एखादा जोक फॉरवर्ड करण्यापासून ते कामाची रुपरेषा ठरवण्यापर्यंत अनेकजण या माध्यमाचा सर्रास वापर करतात. याव्दारे पाठवले जाणारे व्हिडिओ आणि मिमही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. काही जण आपला व्यवसाय वाढविण्यासाठीही या माध्यमाचा वापर करतात. अशातच विशिष्ट मेसेज तुम्ही अमुक जणांना पाठविल्यास तुम्हाला इतके जीबी डेटा मोफत मिळेल अशा स्वरुपाचे मेसेजही फिरताना दिसतात. अनेकदा अशा ऑफर्समध्ये टॉकटाईम देण्यात येईल असेही सांगण्यात आलेले असते. टॉकटाइम किंवा इंटरनेट डेटाच्या आशेने आपण तो मेसेज फॉरवर्डही करतो. मात्र शेवटी असे काही नसल्याचे आपल्याला समजते.

अशाप्रकारच्या मेसेजचा उद्देश हा आपल्याला कोणतीही सुविधा मोफत देण्याचा नसून आपला डेटा कलेक्ट करणे हा असतो. मार्केटींग पॉलिसी ठेऊन वेगवेगळ्या कंपन्या आपले नाव आणि मोबाईल क्रमांक जमा करतात. त्याचा वापर या कंपन्या आपल्या उत्पादनांचे मार्केटींग करण्यासाठी करतात. नंतर या कंपन्या तुम्हाला इतके मेसेज करतात की त्यामुळे तुमचा इनबॉक्स भरुन जातो. आता दिवसागणिक आपल्या मोबाईलमध्ये येऊन पडणाऱ्या या लिंक घातक आहेत की नाही हे कसे ओळखायचे? याचे काही सामान्य ठोकताळे आहेत.

१. आपल्याला कोणतीही गोष्ट मोफत देण्यासाठी कोणीही नाही.

२. अशाप्रकारे कोणी एखादी गोष्ट मोफत देतच असेल तर त्यापासून त्यांना काहीतरी फायदा आहे हे लक्षात घ्यावे.

३. तुम्हाला आलेल्या मेसेजची लिंक तपासून पहा. ती लिंक क्लिक केल्यावर तिच वेबसाइट ओपन होत असेल तर ठिक आहे. यामध्ये वेगळीच लिंक ओपन होत असेल तर तुम्हाला आलेला मेसेज फेक आहे हे वेळीच लक्षात घ्या.

४. यामध्ये तुम्हाला सरकारकडून सोलर पॅनल किंवा इन्शुरन्स आणि निवृत्तीवेतन यांसारख्या सुविधा देण्यात येत आहेत असे मेसेज येतात. प्रत्यक्षात या लिंकवर क्लिक केल्यावर कळते की या सरकारच्या योजना नसून त्या खासगी कंपनीच्या योजना आहेत.

५. काहीवेळा एखाद्या जाहिरातीची लिंक येते. यामध्ये तुम्हाला काही माहिती भरावी लागते. त्यानंतर विशेष टप्प्यांनंतर या लिंकमध्ये काहीच नसल्याचे तुमच्या लक्षात येते. मात्र तोपर्यंत तुमची माहिती काढून घेतलेली असते.

त्यामुळे अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. कोणीही आपल्याला कोणत्याही सुविधा मोफत देण्यासाठी नाही हे लक्षात घेऊन व्हॉटसअॅप किंवा इतर कोणत्याही माध्यमावर येणाऱ्या लिंकवर क्लिक करु नये.