हिवाळी ऋतू हा अनेक जुन्या व्याधी आणि दुखण्यांना निमंत्रण देणारा ठरतो. अनेक वयस्कर लोकांना या काळात सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. या व्यक्तींना चालताना, उठताना आणि बसताना किंवा कोणतेही काम करताना सांध्यांमधून कळा येतात. काहींना एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे कठीण होऊन बसते. मानेपासून अगदी टाचेपर्यंतच्या हाडांचे हे दुखणे अनेकदा इतके वाढते की, ते सहन होईनासे होते. अशावेळी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

नियमित व्यायाम आवश्यक  

व्यायाम करणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. व्यायामामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. शरीराचे सर्व कार्य सुरळीत होते. हिवाळ्यात व्यायामाला सुरुवात करावी असे म्हणतात. सांधे आणि शिरा मोकळ्या होण्यासाठी व्यायामाची आवश्यकता असते. शरीरातील तणाव दूर होऊन सांध्यांचे त्रास कमी होण्यास मदत होते. जॉगिंगसारखा व्यायाम, सूर्यनमस्कार तसेच योगासने सांधेदुखीवर उपयुक्त ठरतात.

चांगला आहार गरजेचा 

आरोग्याच्या अनेक तक्रारींसाठी आपला आहार कारणीभूत असतो. सांधेदुखीचा त्रास होऊ नये यासाठीही योग्य तो आहार घेणे आवश्यक असते. हाडांना योग्य प्रमाणात खनिजे, व्हिटॅमिन्स आणि प्रथिने मिळाल्यास सांधेदुखी होत नाही. तुमच्या आहारात दूध, अंडी, फळे, पालेभाज्या, कडधान्ये आणि इतरही आवश्यक घटक असणे गरजेचे असते. अशक्तपणामुळे सांधे दुखत असल्यास मेथीचे व डिंकाचे लाडू नियमित खाल्ल्यास फायदा होतो.

सैंधव मीठ

सैंधव मीठात शरीराला आवश्यक असणारे काही घटक असतात. यामधील मॅगनेशियम आणि सल्फेट यांमुळे सांधेदुखी कमी होते. आंघोळीच्या कोमट पाण्यात सैंधव मीठ टाकावे ते योग्य पद्धतीने एकत्र झाल्यास टॉवेल वर टाकून तो टॉवेल ज्याठिकाणी दुखत आहे तिथे ठेवावा.

उपयुक्त काढा

सांधेदुखीचा त्रास असल्यास चार कप पाण्यात दोन चमचे बडीशोप व सुंठीचा तुकडा घालून ते उकळवावे. हे मिश्रण आटल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा एरंडेल तेल घालून प्यावे. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होईल.

निरगुंड

निरगुंडीचा पाला सांधेदुखीवर उपयुक्त ठरतात. आयुर्वेदात याचे विशेष म्हत्त्व सांगितले आहे. निरगुंड पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने दुखत असलेला सांधा शेकल्यास सुज आणि वेदना कमी होतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)