News Flash

घरचा वैद्य : कार्श्य आणि केसांचे विकार

अशी घ्या केसांची काळजी

वाचक मित्रांनी बहुधा ‘जाडय़ा रडय़ाची’ कथा वाचली असेल. इंग्रजीत त्याला ‘लॉरेल हार्डीची’ कथा म्हणतात. आपल्याला उद्या जर देव भेटला व ‘वर माग’ म्हणाला; तर मी आहे तसा बारीक ‘चवळीची शेंगच’ राहू दे असे सांगेन. आपले शरीर बारीक असणे हा आपल्या जीवनांतील एक प्लस पॉइंट आहे असे निश्चित समजावे. बारीक शरीर सहसा काटक असते. कृश व्यक्तीला हृद्रोग, मधुमेह, शोथ, मूत्रपिंड विकार, कंड या रोगलक्षणांची बहुधा बाधा होत नाही. पण काही वेळा हा विकार आनुवंशिक असतो. तर बऱ्याच वेळा चुकीच्या जीवनपद्धतीमुळे; निकस व अपुरा आहार, उत्तम व शांत झोपेचा अभाव; दारू, तंबाखू, धूम्रपान अशासारखी व्यसने; सततची रात्रपाळी, शारीरिक ताकदीच्या बाहेर कामे करणे; वारंवार ताप किंवा कफ, सर्दी, खोकला, स्वरभंग, दमा, क्षय यांसारख्या आजारांमुळे काश्र्य विकाराची पाश्र्वभूमी तयार होते. अशा विविध कारणांचा पूर्णपणे निपटा झाल्याशिवाय; संबंधित कृश व्यक्तीची प्रकृती अजिबात सुधारत नाही. आयुर्वेदीय चिकित्सकांकडे च्यवनप्राश, धात्तीरसायन, कुष्मांडपाक, अश्वगंधापाक, अश्वगंधारिष्ट, सुवर्णमाक्षिकादि वटी, पुष्टी वटी, शृंगभस्म, चंद्रप्रभा; अशी खूप खूप टॉनिक औषधे असतात. पण अशा महागडय़ा औषधांच्या नादी लागण्यापेक्षा पुढील मुद्दय़ांकडे प्रथम लक्ष द्यावे.

संबंधित कृश व्यक्ती जे जेवण जेवते; ते रुची ठेवून जेवते का याकडे बारकाईने लक्ष हवे. जेवणखाण करताना मन प्रसन्न असायला हवे. मन प्रसन्न असले की आपसूकच आपली एकादशपंच कर्मेद्रिये, पंच ज्ञानेंद्रिये आणि आत्मा आपापली कामे नीट करतात. ‘कोंडय़ाचा मांडा’ करता येतो. कृश व्यक्तीने ठरवून किमान व्यायाम; सूर्यनमस्कार, जोर बैठका, पोहणे किंवा मोकळ्या हवेत भरपूर फिरणे; असे करणे आवश्यक आहे. जेवताना जेवणाकडे शंभर टक्के लक्ष द्यावे. भोजनाचे वेळी वर्तमानपत्र वाचन किंवा टीव्ही बघणे टाळावे. रात्रो खूप उशिरा किंवा राक्षसकाली जेवू नये.
आपल्या आहारांत ठरवून पुढील पदार्थाचा समावेश आहे का हे कटाक्षाने पाहावे. गहू, वाटाणा, हरभरा, उडीद, मूग अशी कडधान्ये; दही, कांदा, बटाटा, तूप, दूध, अंडी, मांसाहार; याबरोबरच आंबा, केळे, चिकू, पेरू, डाळिंब, सफरचंद, ताडगोळे, पांढरे खरबूज अशी फळे, आपणास शक्य असल्यास अक्रोड, काजू, खजूर, खारीक, जरदाळू, पिस्ता, बदाम, बेदाणा, हळीव, शेंगदाणे, ओले किंवा सुके खोबरे यांची निवड करावी. फ्लॉवर, बटाटा, कांदा, रताळे अशा भाज्यांची निवड करावी. आहाराला पुरेशा व्यायामाची जोड हवी.

केसांचे विकार
तुम्ही-आम्ही दूरदर्शनवर जाहिरातीत नित्य, आपल्या लांबसडक केसांचे रहस्य; लाडिकपणे सांगणारी सौंदर्यवती महिला पाहात आहोत. पण हे भाग्य सगळ्याच महिलांना मिळत नाही. असे लांबसडक, सुंदर केस असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असते. पण आजकाल जिकडे पाहावे तिकडे केसांच्या समस्या पाहायला मिळतात. केसांचे रोग विविध प्रकारचे आहेत. केस गळणे, पांढरे होणे, केसांत कोंडा होणे, खवडे होणे, अकाली टक्कल पडणे, केस रुक्ष होणे, केसांना फाटे फुटणे; इ. इ. केसांच्या अशा समस्या केवळ शाम्पू, साबण, केस धुवायच्या पावडरी वा विविध तेले चोपडून संपत नाहीत. त्याकरिता काही महत्त्वाचे खाण्यापिण्याचे यमनियम पाळणे आवश्यक आहे. हे पथ्यपाणी फार खटाटोपीचे वा खर्चीक अजिबात नाही.

सर्वसामान्यपणे केसांच्या बहुतेक सर्व समस्या या जास्त मिठाचे सेवन, आंबट-खारट पदार्थ उदा. लोणची, पापड, शिळे फरमेन्टेड अन्न, दही, लिंबू, चिंच, कैरी यांचे अतिसेवन यामुळे उद्भवतात. या गोष्टी टाळता येतात. आंघोळीकरिता दूषित पाणी वापरण्याशिवाय इलाज नसेल तर केस गळणे, खराब वा पांढरे होणे या समस्यांनी घेरले जाते. बोअरचे पाणी, गढूळ पाणी किंवा संथ तलावातील पाण्यामुळे केसांच्या मुळांना इजा होते. जास्त मीठ असणाऱ्या पदार्थामुळे नवीन केस येऊ शकत नाहीत, केसांत कोंडा होतो. केस पांढरे होतात.

या सर्व समस्यांवर वर्तमानपत्रे; रेडिओ, दूरदर्शनवरील जाहिरातींमुळे अजिबात मात करता येत नाही. आयुर्वेदीय तज्ज्ञ पोटात घेण्याकरिता आरोग्यवर्धिनी, लघुसूतशेखर, रससिन चूर्ण अशी औषधे सुचवितात. महाभृंगराज तेल, आमलक्यादी तेल, जवा कुसुमादी तेल अशांची लक्षणेपरत्वे निवड करायला सांगतात. केसांच्या मुळाशी हलक्या हाताने तीळ तेल, खोबरेल तेल नियमितपणे व्यवस्थित जिरवले तरी केशवर्धनाचे काम खात्रीने होते. केसांत खवडे, उवा, लिखा असल्यास करंजेल तेलात थोडा कापूर मिसळून ते मिश्रण सायंकाळी किंवा रात्री झोपताना जिरवावे. खूप लवकर टक्कल पडत असेल, केसांना फाटे फुटत असतील, केस खूप रुक्ष झाले असतील तर; घरी ओला नारळ खवून त्यांत थोडे पाणी मिसळून, ते मिश्रण मंदाग्नीवर सावकाश आटवावे. उत्तम नारिकेल तेल तयार होते. कोरफड, आवळा, जास्वंद, गुलाबकळी, उपळसरी यांच्या स्वरस किंवा काठय़ांबरोबर तीळ तेल वा खोबरेल तेल मिसळून सावकाश आटवावे. अशा रीतीने तयार केलेले तेल वापरावे. केस धुण्याकरिता शाम्पू, साबण, सोडा वापरण्याऐवजी आवळा, नागरमोथा, बावची, कापूरकाचरी असे मिश्रण असणारे केश चूर्णाचा एकदोन दिवसाआड वापर करावा. शिकेकाई, रिठा, संत्री किंवा लिंबाच्या सालींचाही केस धुवायला वापर करावा. ज्यांना स्नानाकरिता समुद्राचे पाणीच वापरावे लागते त्यांनी केसांना फडके बांधून समुद्रस्नान करावे. म्हणजे केसांची फार हानी होत नाही. अशा रीतीने केसांची ‘केस’ जिंकेल तोच खरा वैद्य किंवा हेअर स्पेशालिस्ट जाणावा.
केसांच्या समस्या केवळ शाम्पू, साबण, केस धुवायच्या पावडरी वा विविध तेले चोपडून संपत नाहीत. त्याकरिता काही महत्त्वाचे खाण्यापिण्याचे यमनियम पाळणे आवश्यक आहे.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2017 4:26 pm

Web Title: how to take care of hair and hair care
Next Stories
1 Mobile Review : झेनफोन थ्री एस मॅक्स
2 प्लास्टिकमधील रसायनामुळे स्तनाच्या कर्करोगात वाढ
3 मिशेल ओबामांचा रिलॅक्स्ड लूक
Just Now!
X