आपल्या त्वचेचा पोत, रंग हे आपल्या हातात नसते. काहींची त्वचा खूप कोरडी असते तर काहींची खुप तेलकट असते. तेलकट त्वचा असणाऱ्यांचा चेहरा सतत तेलकट दिसतो. या लोकांच्या चेहऱ्याच्या त्वचेतून नैसर्गिकपणे तेल येत असल्याने चेहरा ठराविक काळाने काळवंडल्यासारखा दिसतो. अशा लोकांना थंडीतही आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी काही सोप्या गोष्टी केल्यास त्वचेचा पोत चांगला राहण्यास मदत होते. पाहूयात काय आहेत हे उपाय…

चेहरा दिवसातून दोनदा धुवा

चेहऱ्यावरील तेलकट पदार्थ निघून जाण्यासाठी चेहरा दिवसातून दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक असते. विशेषत: थंडीच्या दिवसात हा तेलकटपणा कमी होतो त्यामुळे त्वचा कोरडी दिसायला लागते. अशावेळी क्रीम असलेले फेसवॉश वापरून चेहरा धुतल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो.

तेलकटपणा नसलेले मॉईश्चरायझर वापरा

तेलकट त्वचेसाठी तेलकटपणाचा घटक नसलेले मॉईश्चरायझर वापरल्यास त्याचा फायदा होतो. ज्या मॉईश्चरायझरमध्ये व्हीटॅमिन ई जास्त प्रमाणात असते असे मॉईश्चरायझर वापरावे. यामुळे चेहऱ्यावर तेलकट घटकांची निर्मिती होण्यापासून तुमची सुटका होईल.

जास्तीत जास्त पाणी प्या

जास्तीत जास्त पाणी पिणे चांगल्या त्वचेसाठी अत्यावश्यक असते. थंडीच्या दिवसात कमी पाणी प्यायले जाते. मात्र त्यामुळे त्वचा त्वचा जास्त कोरडी आणि निस्तेज होते. पण पाण्याचे प्रमाण जास्त ठेवल्यास त्वचा तजेलदार दिसण्यास मदत होते.