करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील लोक हादरले आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य आणि प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यावर सर्वांनीच लक्ष केंद्रित केले आहे. चांगले आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती यांची गुरुकिल्ली म्हणजे संतुलित आहार आणि चांगल्या प्रतीचे भरपूर प्रोटीन. अनेक प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांचा आपण आपल्या रोजच्या आहारात समावेश करू शकतो. यामध्ये फिश, चिकन, दूध, अंडी, तसेच काही शाकाहारी पदार्थांचा समावेश होतो. मांसाहारी लोकांमध्ये चिकन सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. अनेकजण दररोजच्या जेवणात चिकन घेतात. चिकन केवळ प्रथिनांनीच समृद्धच नसते, तर त्यात इतर पौष्टिक पदार्थदेखील असतात. त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास विविध लाभ मिळतात. ‘हिंदुजा हॉस्पिटल’च्या मुख्य आहारतज्ज्ञ इंद्रायणी पवार यांनी, प्रतिकारशक्ती वाढवण्याचा चिकन हा एक चांगला मार्ग का आहे, याचे विवेचन केले आहे.

प्रथिने: चिकनमध्ये चरबीचे प्रमाण कमी असल्याने कमी चरबीयुक्त प्रथिनांचा तो एक चांगला स्त्रोत आहे. याचा अर्थ असा, की त्यात प्रथिनांचे प्रमाण जास्त आणि चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते किंवा वजन आटोक्यात राहून स्नायूंचा विकास होतो.

कॅल्शियम आणि फॉस्फरस: चिकनमध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फरस यांसारख्या खनिज पदार्थांमुळे दात व हाडे मजबूत, निरोगी राहतात. यामुळे वृद्धावस्थेत होणाऱ्या संधिवात आणि ‘ऑस्टिओपोरोसिस’सारख्या वेदनादायक हाडांच्या आजाराचा धोका कमी होतो. त्याशिवाय मूत्रपिंड, यकृत आणि मध्यवर्ती मज्जासंस्था यांचे कार्यदेखील सुरळीत चालू राहते.

व्हिटॅमिन बी-सिक्स आणि फॅटी अॅसिडस्: हृदयाच्या आरोग्यास चालना देणारे व्हिटॅमिन बी-सिक्स हे चिकनमध्ये भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. चिकन हा ‘ओमेगा-3 फॅटी अॅसिडस्’ आणि ‘नियासिन’चाही चांगला स्रोत आहे, जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे लाभ देतात. त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरात कोलेस्टेरॉल कमी होते, परिणामी हृदयविकाराचा आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

सेलेनियम: चिकनमध्ये सेलेनियम नावाचे एक शक्तिशाली खनिजदेखील असते. ते शरीरातील चयापचय कार्यक्षमता आणि थायरॉईडचे कार्य यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. थायरॉईड बिघडल्यामुळे होणाऱ्या हार्मोनल असंतुलनाची काळजी घेण्यातही ते मदत करते.

या सर्व गुणांमुळे चिकन हे एखाद्या व्यक्तीचे सर्वागीण आरोग्य सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते, हे सिद्ध होते. अर्थात ते निरोगी पद्धतीने शिजवलेले असावे. म्हणूनच, सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात प्रतिकारशक्ती मजबूत राखणे अत्यंत महत्त्वाचे असताना, गैरसमज व अफवा यांच्या नादी लागून या पौष्टिक आहाराचा वापर कमी करू नये.