Hyundai कंपनीची Hyundai Venue ही नवीन कार 21 मे रोजी लाँच होणार आहे. सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ही कार देशातील पहिली मेड-इन-इंडिया कनेक्टेड कार ठरेल असा कंपनीचा दावा आहे. 2 मे पासून या सब-कॉम्पॅक्ट SUV साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली असून ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या गाडीच्या 2 हजाराहून अधिक युनिट्सची बुकिंग झाली. दरतासाला या गाडीसाठी 84 बुकिंग येत असल्याचंही समजतंय. कंपनीच्या संकेतस्थळावर अथवा कंपनीच्या डिलर्सकडे 21 हजार रुपयांमध्ये या कारसाठी बुकिंग करता येणार आहे.

Hyundai Venue 33 नव्या फीचर्ससह पहिली मेड-इन इंडिया कनेक्टेड कार असेल, असा दावा कंपनीने केला आहे. 33 पैकी 10 फीचर केवळ भारतासाठी विकसित करण्यात आले आहेत. यातील काही आधुनिक फीचर्स केवळ BMW7 सारख्या कारमध्ये पहायला मिळतात. Hyundai Venue मधील 33 कनेक्टेड फीचर एखाद्या अॅप किंवा ह्युमन मशीन इंटरफेसद्वारे जोडले जातील. या कारमध्ये कंपनीने ‘ब्ल्यूलिंक’ कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

ही कार चार व्हेरिअंट आणि तीन इंजिनच्या पर्यायांसह उपलब्ध असणार आहे. अद्याप व्हेरिअंट्सबाबत अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. या SUV मध्ये नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.2-लिटर नॅचरली अॅस्पायरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.4-लिटर डिझेल इंजिन मिळेल. थ्री-सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिनासह 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रांसमिशन मिळेल, तर 1.2-लिटर पेट्रोल आणि 1.4-लिटर डिझेल इंजिनमध्ये अनुक्रमे 5 आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. 8 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान या कारची किंमत असण्याची शक्यता आहे.

विशेषतः भारतासाठी विकसित करण्यात आलेल्या फीचर्समध्ये ड्रायव्हिंग इंफॉर्मेशन/ बिहेवियर, डेस्टिनेशन शेअरिंग, रिअल टाइम व्हेइकल ट्रॅकिंग, व्हेइकल लोकेशन शेअरिंग, जिओ-फेंस अलर्ट, स्पीड अलर्ट, टाइम फेंसिंग अलर्ट, वॉलेट अलर्ट, आयडल अलर्ट आणि व्हॉइस रिकग्निशन या फीचर्सचा समावेश असण्याची शक्यता आहे.
भारतीय बाजारामध्ये Hyundai Venue ची स्पर्धा मारुती सुझुकी विटारा, फोर्ड इकोस्पोर्ट, टाटा नेक्सॉन आणि महिंद्रा XUV300 यांसारख्या कारसोबत असणार आहे.