मोबाईल कंपन्या एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सातत्याने आपले नवनवीन प्लॅन्स बाजारात दाखल करत आहेत. यामध्येही इंटरनेट डेटा प्लॅन देऊन ग्राहकांना खूश करण्यासाठी कंपन्यांची चढाओढ सुरु आहे. जिओ आणि बीएसएनएल या कंपन्यांनंतर आता आयडीयाने आपल्य ग्राहकांसाठी असाच एक खास डेटा प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना १६४ जीबी डेटा देण्यात येणार आहे. प्रीपेड युजर्ससाठी डेटाबरोबरच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही देण्यात येणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी ८२ दिवसांची असेल असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्लॅनची किंमत ४९९ रुपये असून त्यामध्ये ग्राहकांना २ जीबी डेटा मिळेल.

रोजची मर्यादा ओलांडल्यानंतर आयडीया पुढील प्रत्येक १० केबीसाठी ४ पैसे दर आकारला जाणार आहे. या ऑफरनुसार युजर्सना दिवसाला २५० मिनिटे आणि ७ दिवसांसाठी १ हजार मिनिटे मोफत कॉलची सुविधा मिळेल. त्यापुढील प्रत्येक सेकंदासाठी १ पैसा आकारला जाईल. विशेष म्हणजे आयडीयाने या प्लॅनवर मोफत नॅशनल रोमिंगची सुविधाही दिली आहे. याशिवाय १०० मेसेज मोफत करता येणार आहेत. ही मर्यादा संपल्यानंतर प्रत्येक लोकल मेसेजसाठी १ रुपया आणि नॅशनल मेसेजसाठी १.५ रुपये मोजावे लागणार आहेत.

एअरटेलच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ४९९ रुपयांमध्ये रोज २ जीबी डेटा मिळत मिळत आहे ज्याची व्हॅलिडीटी ८२ दिवसांचीच आहे. याबरोबरच ४९९ च्या प्रीपेड प्लॅनमध्येही १६४ जीबी डेटा ८२ दिवसांसाठी मिळणार आहे. याशिवाय जियो ४९८ रुपयांमध्ये ९१ दिवसांसाठी १८२ जीबी डेटा मिळतो. बीएसएनएल ४९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ४५ जीबी डेटा देत आहे. त्यामुळे आयडीयाचा हा प्लॅन या सगळ्या प्लॅनला चांगलीच टक्कर देणार आहे असे म्हणता येईल.