दिवसभर ऑफीसमध्ये बसून आणि दिर्घ काळ केलेल्या प्रवासानी सध्या अनेकांना पाठदुखीचा त्रास उद्भवतो. शालेय वयातील मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्व वयोगटातील लोक सध्या या समस्येने त्रस्त असतात. कधी हे दुखणे अतिशय प्राथमिक स्वरुपाचे असते तर कधी ते गंभीरही असू शकते. या दुखण्यामागे अनेक कारणे असली तरीही चुकीची जीवनशैली हे यातील एक महत्त्वाचे कारण असल्याचे दिसते. व्यायामाचा अभाव, चुकीचे पोश्चर यांमुळे हे दुखणे उद्भवते.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, तुम्हाला पाठदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या चालण्यामध्ये फरक जाणवतो आणि तुमची सहनशक्तीही कमी होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीकडे आणि पाठदुखीसारख्या समस्यांकडे त्वरीत लक्ष द्यायला हवे असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. एलेनॉर सिमेन्सिक या अमेरिकेतील अभ्यासकांनी हे संशोधन केले असून त्यांनी त्याबाबत काही निष्कर्ष नोंदवले आहेत. अमेरिकन जेरिएट्रीक्स सोसायटीच्या जनरलमध्ये हा प्रबंध सादर करण्यात आला आहे.

या अभ्यासासाठी १ ते ५ वर्षांपासून पाठदुखीचा त्रास असणाऱ्या काही व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. या लोकांना ४०० मीटर अंतर चालण्यासाठी सामान्य लोकांपेक्षा किती वेळ लागतो हे यामध्ये तपासण्यात आले. या लोकांना पाठदुखीमुळे कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामध्ये या लोकांना पाठदुखीमुळे सामान्यपणे चालण्यास अडचणी येतात, त्यामुळे हे लोक इतरांपेक्षा दैनंदिन कामे धीम्या गतीने करतात. तसेच पाठदुखी असणाऱ्या लोकांची सहनशक्तीही कमी असते. त्यामुळे या पाठदुखीवर वेळीच उपचार करणे आवश्यक असल्याचा निष्कर्षही या अभ्यासकांनी मांडला.