केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे मत
वैद्यकीय संशोधकांनी भारतीय समूहाला हितकारक ठरेल अशा प्रकारचे संशोधन करणे आवश्यक आहे. भारतातील पारंपरिक वैद्यकीय ज्ञानाचा त्यासाठी वापर करावा, असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले. भारतीय आरोग्य संशोधन परिषद (आयसीएमआर)ला संबोधित करताना त्यांनी आगामी काळातील वैद्यकीय संशोधनाची रूपरेषा मांडली.
‘‘आपणास अनेक आव्हानांना सामोरे जायचे आहे, पण सध्याची प्राथमिकता ही भारतीय समाज तोंड देत असलेल्या आणि त्यांच्याशी समग्र अशा आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्याकडे आहे. त्यासाठी सध्या आघाडीवर असलेल्या आरोग्याशी निगडित १० रोगांची यादी तयार करताना त्यावरील उपाय शोधून काढण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे नड्डा यांनी सांगितले. संशोधकांचा दृष्टिकोन हा वैद्यकीय संशोधन आणि पारंपरिक औषधांचा वापर यांचा अंतर्भाव करणारा असावा, असेही ते म्हणाले.
जेव्हा आपण संशोधन करतो, त्या वेळी त्यांची दिशा ही एकाच दृष्टिकोनावर आधारित न राहता अन्य विषयांनाही अंतर्भूत करणारी असावी. आयसीएमआरने संशोधनाची धार अधिक तीक्ष्ण करताना होणारे संशोधन हे नव्या प्रतिभांना आकर्षित करणारे, विविध स्रोतांतील नव्या कौशल्यांमध्ये सुधारणा, दिवसागणिक बदलणाऱ्या जीवनशैलीला अनुरूप आणि पारंपरिक माहितीला पूरक असे असावे. उपलब्ध होणारे संशोधन हे सर्व समस्यांचे निराकरण करणारे आणि परवडणारे असावे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यासाठीच आयसीएमआरला आयुष मंत्रालयाशी संलग्न करताना पारंपरिक औषधांचा अमूल्य ठेवा जतन करण्यात येणार आहे. आयसीएमआरच्या डायरेक्टर जनरल सोमय्या स्वामीनाथन यांच्या मते, सहकार्याचे हे नवे पर्व आरोग्य क्षेत्रातील सुरक्षा यंत्रणांसोबत जोडताना देशातील दुर्गम आणि आदिवासी यांच्यापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. त्याचबरोबर ईशान्य भारतातील आरोग्य सेवेच्या मर्यादा लक्षात घेता सहकार्य करण्याची विनंती येथील राज्य सरकारांना केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)