खासगी विमान कंपनी इंडिगोचं सर्व्हर डिसेंबर महिन्यात हॅक झालं होतं, असा धक्कादायक खुलासा इंडिगोकडून करण्यात आला आहे. यादरम्यान हॅकर्सनी कंपनीचे काही इंटर्नल डॉक्युमेंट्स चोरल्याची भीती व्यक्त होत असून चोरलेले कागदपत्र हॅकर्सकडून सार्वजनिक संकेतस्थळांवर अपलोड केले जाऊ शकतात अशी शंका कंपनीने व्यक्त केली आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला इंडिगोचं सर्व्हर हॅक झालं होतं, अशी माहिती कंपनीकडून एका निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. पण हॅक झाल्यानंतर खूप कमी कालावधीत सर्व्हरवर पुन्हा ताबा मिळवण्यात यश आलं असंही कंपनीने सांगितलं. मात्र यावेळी हॅकर्सनी कंपनीचे काही इंटर्नल डॉक्युमेंट्स चोरले असल्याची भीती इंडिगोने व्यक्त केली असून चोरलेले कागदपत्र सार्वजनिक वेबसाइट्सवर अपलोड केले जाण्याची शक्यताही कंपनीने वर्तवली आहे.


दरम्यान, ‘या घटनेचं गांभीर्य आम्ही जाणतो, त्यामुळे घटनेचा सखोल तपास करता यावा यासाठी तज्ज्ञ व अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहोत’ अशी माहितीही कंपनीकडून देण्यात आली आहे.