भारतात २००५ ते २०१५ या काळात पाच वर्षांखालील १० लाख मुलांचे मृत्यू टाळण्यात यश आले आहे. न्यूमोनिया, अतिसार, धनुर्वात, गोवर यांसारख्या रोगांवर मात करण्याने हा फरक दिसून आला, असे लँसेट या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या नव्या संशोधनात म्हटले आहे. भारतात १ ते ५९ महिन्यांच्या मुलांमध्ये मृत्युदर कमी होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बालमृत्युदर आणखी पाच टक्क्यांनी कमी होऊन त्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी घालून दिलेले उद्दिष्ट साध्य होईल. २०३० पर्यंत बालमृत्यूचे प्रमाण हजारात २५ इतके खाली आणण्याचे संयुक्त राष्ट्रांनी दिलेले उद्दिष्ट आहे. २००० ते २०१५ या काळात पाच वर्षांखालील २९ दशलक्ष मुले विविध कारणांनी भारतात मरण पावली, असे संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीत दिसून आले आहे. पण बालमृत्युदर वाढण्याचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे दिसून आले आहे. तो दर जर कायम राहिला असता तर या काळात ३० दशलक्ष मुले मरण पावली असती, पण तसे झालेले नाही, असे या संशोधनाचे लेखक डॉ. प्रभात झा यांनी म्हटले आहे. गोवर लसीचा दुसरा डोस, सरकारच्या गर्भवती महिलांसाठीच्या योजना यांचा चांगला परिणाम झाल्यामुळे हा फरक दिसला आहे. १ ते ५९ महिने वयाच्या मुलांमध्ये हिवतापाने मृत्यू पावण्याचा दर अजून कमी झालेला नाही. नवजात बालकांच्या मृत्यूचा दर शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात दुप्पटच असून कमी वजनाची बालके जन्माला येण्याने ग्रामीण भागात जास्त मृत्यू होतात. मुलगा व मुलगी यांच्यातील बालमृत्युदरातील तफावतही कमी होत चालली आहे.