जगभरातील सर्वाधिक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp आणि फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्रामचं नामकरण होणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर आता या दोन्ही अॅपचं नामकरण होण्यास सुरूवात झालीये. व्हॉट्स अॅपच्या लेटेस्ट बिटा व्हर्जनवर ‘व्हॉट्स अॅप फ्रॉम फेसबुक’हे नवं नाव दिसण्यास सुरूवात झाल्याचं वृत्त आहे. व्हॉट्स अॅपच्या 2.19.228. या लेटेस्ट बिटा व्हर्जनवर नवं नाव अपडेट होण्यास सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामच्याही 106.0.0.24.118. या लेटेस्ट व्हर्जनमध्ये ‘इन्स्टाग्राम फ्रॉम फेसबुक’ हे नाव दिसत आहे. एका आठवड्यात सामान्य युजर्सपर्यंतही हे नवे अपडेट उपलब्ध होण्याची शक्यता आहे. फेसबुकने यापूर्वीच दोन्ही लोकप्रिय अॅप्लिकेशन्सचे रिब्रॅण्डींग करणार असल्याचे जाहीर केले होते.

हे दोन्ही अॅप फेसबुकच्या मालकीच्या आहेत. मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या फेसबुकने इन्स्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय फोटो शेअरिंग अॅप्लिकेशन २०१२ साली विकत घेतले. तर २०१४ साली व्हॉट्स अॅपची मालकीही फेसबुककडे गेली. तेव्हापासून या दोन्ही कंपन्या फेसबुकच्या मालकीच्या असल्या तरी संयुक्तपणे काम करत आहेत. पण या दोन्ही अॅपच्या नावामध्ये कुठेही फेसबुकचा उल्लेख आतापर्यंत नव्हता. त्यामुळे अनेकांना या दोन्ही अॅपची मालकी फेसबुककडे असल्याची माहितीच नव्हती. परिणामी कंपनीकडून फेसबुकच्या नावाचा या दोन्ही अॅपसाठी वापर कऱण्याचा निर्णय घेण्यात आला. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपचे स्वत:चे वेगळे व्यवस्थापक, कामगार आणि ऑफिस आहेत. ही दोन्ही लोकप्रिय अॅप्लिकेशन्स आपल्या मालकीची आहेत हे दाखवण्यासाठी फेसबुकने त्यांची नावे बदलली आहेत. हे प्रोडक्ट आणि सेवा फेसबुकच्या मालकीचे आहेत हे दाखवण्यासाठी हे बदल करण्यात येत आहे. भविष्यात फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि इन्स्टाग्राम एकमेकांशी संग्लन करण्याचा कंपनीचा विचार असल्याचीही चर्चा आहे. या दोन्ही अॅपच्या संकेतस्थळावरील लॉगइन पेसेजवरील नावांच्या नंतरही ‘फ्रॉम फेसबुक’ या शब्दांचा समावेश केला जाणार आहे.

दोन्ही कंपन्यांची मालकी घेतल्यानंतर फेसबुकने इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅपवर अनेक नवीन फिचर्स उपलब्ध करुन दिले आहेत. उदाहर्णार्थ इन्स्टाग्रामवरील स्टोरीजची संकल्पना व्हॉट्स अॅपवर स्टेटसच्या तर फेसबुकवर स्टोरीच्या स्वरुपात अमलात आणण्यात आली. फेसबुकने या कंपन्यांना विकत घेतल्यापासून या दोन्ही अॅप्लिकेशनचे वापरकर्ते वाढावेत म्हणून कंपनी विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. मागील वर्षभरामध्ये सुरक्षा आणि डेटा चोरीवरुन फेसबुक अनेक प्रकरणांमध्ये अडकल्याचे पहायला मिळाले. मात्र, या गोंधळापासून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स अॅप या दोन्ही कंपन्यांना लांबच ठेवण्यात आले होते. त्यांच्या विश्वासार्हतेवर कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले नाही.