चहा बरोबरच कॉफी हे पेय देखील आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनलं आहे. कंटाळा घालवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून या पेयाकडे पाहिलं जातं. आज जगभरात International Coffee Day साजरा होत आहे आणि या निमित्तानं आपण कॉफीच्या शोधाची एक रंजक गोष्ट जाणून घेणार आहोत.

कॉफीचा जन्म इथिओपियामधला. मुळात कॉफी या अर्थाने हे लाल रसरशीत फळ आपल्या काही उपयोगाला येईल हे गावी नसल्याने किती वर्षे ते दुर्लक्षित पडून होते याचा अंदाज नाही. अर्थातच कॉफीचा जन्म अमुक साली झाला असे छातीठोकपणे सांगता येत नाही. अशी कथा सांगतात की, इथोओपियाच्या एका गावी काल्दी नामक धनगर राहात होता. तर या धनगराच्या एके दिवशी लक्षात आलं की आपल्या बकऱ्यांना अमुक टेकडय़ांवर चारलं की, त्या अधिकच उनाडतात, आनंदी वाटतात. रात्रभर झोपत नाहीत. त्याने बकऱ्यांचा माग काढल्यावर त्याला आढळलं की, अमुक प्रकारची लाल रसरशीत छोटी फळं खाल्लय़ाने असं होत आहे. त्याला आश्चर्य वाटून तो ती फळं घेऊन जवळच्याच मठात गेला. तिथे प्रार्थना करणाऱ्या साधकांना त्याने ती फळं दाखवून आपलं निरीक्षण सांगितलं. सुरुवातीला त्या साधकांना हे ‘सैतानाचे काम’ वाटले. मात्र त्या फळांना उकळत्या पाण्यात टाकून त्यापासून बनवलेल्या पेयाच्या स्वादाने खूपच तरतरीत वाटते हे त्या साधकांना जाणवलं. त्यामुळे दीर्घकाळ प्रार्थनेसाठी बसणंही सोपं होतं हे त्यांच्या ध्यानात आलं आणि कॉफीच्या फळांचा पेयपानासाठी वापर सुरू झाला.

International Coffee Day : जगातील महागडी कॉफी तयार होते उदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून

या फळांना सुकवून त्यांच्या बियांची पावडर करून रूढार्थाने आज प्रचलित कॉफी तयार व्हायला तसा मध्ये बराच काळ जावा लागला. पंधराव्या शतकाच्या आसपास कॉफीबिया अरबांकडे आल्या. येमेन प्रांतातील अरेबिया येथे कॉफीची रीतसर लागवड सुरू झाली. अरबांकडून युरोपियन खलाशी, प्रवासी यांच्यामार्फत कॉफी युरोपात गेली तिथल्याही खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनली.

कॉफी भारतात कशी आली याचीही एक रंजक गोष्ट आहे. भारतात कॉफीच्या लागवडीचे श्रेय बाबाबुदान या सुफी संताला जाते. बाबाबुदान हे मक्का यात्रेला जात असताना येमेनमधील मोका प्रांतात त्यांचा मुक्काम होता. इथे त्यांना एक दाट, किंचित गोड, किंचित कडवट स्वादाचे पेय प्यायला मिळाले. तो स्वाद त्यांना इतका आवडला की, भारतातही हे पेय उपलब्ध व्हावं असं त्यांना वाटलं. ते पेय अर्थातच कॉफीच्या सात बिया ते गुप्तपणे आपल्यासोबत घेऊन आले. अरब मंडळी आपल्याकडील अशा खास चीजा बाहेर जाऊ न देण्याबाबतीत खूपच दक्ष होती. त्यामुळे बाबाबुदान यांना ही गोष्ट गुप्तपणे पार पाडावी लागली. कर्नाटक येथील चिकमंगळूरमधल्या टेकडीवर त्यांनी या बिया रुजवून कॉफीच्या भारतीय पर्वाची सुरुवात केली.

या टेकडय़ांना आज ‘बाबाबुदान हिल्स’ म्हणूनच ओळखले जाते. भारतातील दाक्षिणात्य मंडळी आणि कॉफीचे दृढ नाते यांची उकल या कथेतून होते. कॉफीचा भारतीय प्रवास दक्षिणेकडून सुरू झाला. बाबाबुदान यांच्या या कथेतील मोका प्रांताचा उल्लेख वाचल्यावर आपण पीत असलेल्या मोका कॉफीच्या नावाचा अर्थही कळतो.

(रश्मि वारंग यांच्या ‘खाऊच्या शोधकथा : कॉफी’ या लेखातून साभार)