इंटरनेटचे व्यसन असणारांमध्ये ऑफलाइन गेल्यावर हृदयाचे ठोके वाढण्याबरोबरच उच्च रक्तदाबासारखी गंभीर लक्षणे आढळून येत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.

अमली पदार्थाचे व्यसन असणारांमध्येही अशाच प्रकारची लक्षणे आढळून येत असल्याने इंटरनेटचा अधिक वापर करणारांना संशोधकांनी दक्षतेचा इशारा दिला आहे. डिजिटल उपकरणांचा अधिकाधिक वापर करणारांनी हा वापर थांबविल्यानंतर त्यांची चिंता वाढते. मात्र हा मानसिक परिणाम असल्याचे आम्ही शोधून काढले आहे. मानसिक बदलांमुळेच चिंता, चिडचिड वाढते, असे ब्रिटनमधील स्वानसी विद्यापीठातील प्राध्यापक फिल रीड यांनी सांगितले.

मिलान विद्यापीठातील संशोधकांचाही या संशोधनात सहभाग असून १८ ते ३३ वयोगटांतील एकूण १४४ संशोधकांनी हे संशोधन पार पाडले आहे. इंटरनेटचा वापर करण्याआधी आणि नंतर सहभागी झालेल्यांच्या हृदयाचे ठोके आणि रक्तदाब मोजण्यात आला. मोठय़ा प्रमाणात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांचे ऑफलाइन गेल्यावर हृदयाचे ठोके वाढत असून रक्तदाबही वाढत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले आहे. हृदयाचे ठोके आणि रक्तदाबात तीने ते चार टक्क्यांनी वाढ होत असल्याचे संशोधकांना आढळले आहे. त्यामुळे चिंता वाढण्याची भावना निर्माण होते. हे संशोधन नुकतेच प्लस वन या मासिकात प्रसिद्ध झाले आहे.