आयफोनची उत्पादक कंपनी असलेली अॅपल व भारतीय दूरसंचार नियामक मंडळ किंवा ट्राय यांच्यामध्ये सध्या वाद सुरू असून जर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आयफोन हा भारतात कुचकामी ठरू शकतो. गेल्या वर्षभरापासून अॅपल व ट्राय यांच्यामध्ये हा वाद सुरू असून त्याचे पर्यवसान आयफोनधारकांचं मोबाईल कनेक्शन बंद होण्यात होऊ शकतं.
ट्रायनं त्यांच्या नवीन नियमांमध्ये म्हटलं आहे की जर अॅपलनं ट्रायच्या सूचनांचं पालन केलं नाही तर भारतातल्या सगळ्या दूरसंचार कंपन्या आयफोनचं नेटवर्क बंद करतील.

हा वाद नक्की काय आहे?

ट्रायनं व्यापारी संदेशांच्या दळणवळणासंदर्भात एक नियंत्रण जारी केलं होतं, ज्यानुसार ग्राहक त्यांना त्रासदायक वाटणारे, नकोसे वाटणारे कॉल्स किंवा मेसेजेस बंद करू शकतात, त्यांची तक्रार करू शकतात. ट्रायनं त्यासाठी डू नॉट डिस्टर्ब (डीएनडी 2.0) हे अॅपही लाँच केलं आहे. परंतु अॅपल हे अॅप त्यांच्या अॅप स्टोअरमध्ये दाखल करून घेत नाहीये कारण कॉल व मेसेजेसना परवानगी असणारी थर्ड पार्टी अॅप्स अॅपल स्वीकारत नाही.
हा वाद सुमारे वर्षभर सुरू आहे. दरम्यान गुगलनं त्यांच्या प्ले स्टोअरमध्ये डीएनडी 2.0 हे अॅप स्वीकारायला मंजुरी दिली आहे. अॅपलच्या या नकारामुळे ट्रायनेही कडक भूमिका घेतली आहे.

अॅपलचा पर्याय काय आहे?

काही वृत्तांनुसार लवकरच येणाऱ्या आयओएस 12मध्ये अॅपलनं काही फीचर्स समाविष्ट केली आहेत जी ग्राहकांना नकोसे वाटणारे कॉल रिपोर्ट करायची, तक्रार करायची सुविधा देतील. पण यासाठी स्वतंत्र अॅप लाँच करण्यास सरकार उत्सुक नाही.

मग काय होऊ शकतं?

जर या वादामुळे ट्रायने अॅपलचे आयफोन, अॅपल वॉच थ्री सेल्युलर आदी उपकरणं नियमबाह्य असल्याचं सांगत नाकारली तर दूरसंचार कंपन्यांना या उपकरणांशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकांना बंद करावं लागणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर हा वाद मिटला नाही आणि ट्राय आपल्या भूमिकेवर ठाम राहिली तर आयफोन ग्राहकांचं मोबाईल कनेक्शन कट होऊ शकतं.