सॅमसंगने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये घडी घालता येणाऱा Galaxy F या स्मार्टफोनचं मॉडेल सादर केलं होतं. त्यानंतर याता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ शाओमी कंपनीच्या तीन घड्या घालता येणाऱ्या फोनचा असल्याचे सांगण्यात येत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ Evan Blass (@evleaks) ने शेअर केला आहे.


१९ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सर्वात आधी एक मोठा टॅबलेट दिसतो. त्यानंतर त्याची एका फोनच्या आकारात घडी घातली जाते. या फोनमध्ये दिसणारे आयकॉन्स हे शाओमीच्या MIUI शी मिळते जुळते आहेत. हा व्हिडिओ जरा धुसर दिसतोय त्यामुळे त्याचा ब्रँड निश्चित कळू शकलेला नाही. सॅमसंगच्या घडी घालता येणाऱ्या फोनमध्ये २ डिस्प्ले दाखवण्यात आले होते. तर शाओमीच्या या कथित फोनमध्ये एकच मोठा फ्लेक्सिबल डिस्प्ले दाखवण्यात आला आहे. या फोनची स्क्रिन तीन भागात विभागली गेली आहे. आपण या फोनच्या डाव्या आणि उजव्या बाजूची घडी घालू शकतो. घडी घातल्यानंतर तो सर्वसाधारण स्मार्टफोनसारखा कॉम्पॅक्ट दिसतो.

मात्र, हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या Evan Blass यांनीही या व्हिडिओच्या खरेपणाबाबत शंका उपस्थित केली आहे. या व्हिडिओमध्ये एक गुगल मॅप दाखवण्यात आला आहे. हा मॅप संपूर्ण स्क्रिनवर पसरलेला आहे. मात्र, ज्यावेळी या फोनची घडी घातली जाते तेव्हा यावरील सर्व अॅप एकाच स्क्रिनमध्ये समावून जातात. ही कन्सेप्ट सॅमसंगच्या Galaxy F पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.